Loksabha 2019 : माझा खरा राज्याभिषेक २९ एप्रिलला - कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

‘मला संभाजीराजे व्हायचंय’  
यापूर्वी दूरचित्रवाहिन्यांवर सुपरमॅन, स्पायडरमॅन, डोरेमॅन अशी पात्रं पाहून मुलं त्याच भूमिकेच्या मागे लागत. मात्र, आता संभाजीराजेंची मालिका पाहून मुलेही संभाजीराजे व्हायचंय, असे म्हणू लागले आहेत. आजही डॉ. कोल्हे आले असता आर्चित राजेंद्र वाघमारे या साडेचार वर्षांच्या मुलाने डॉ. कोल्हे यांच्या जवळ जात, ‘मला तुमच्यासारखे संभाजीराजे व्हायचंय’, असे म्हणत हटून बसला. अखेर कोल्हे यांनी त्याच्यासमवेत फोटो काढून त्याला शांत केले.

केसनंद - ‘‘शिरूर मतदारसंघातील लढत ही राज्यात लक्षवेधी ठरत आहे. मतदारसंघातील माझे सर्व बंधू, आबालवृद्धांबरोबरच माझ्या साडेदहा लाख माता-भगिनीच येत्या २९ एप्रिल रोजी माझा खराखुरा राज्याभिषेक करतील,’’ असा विश्वास महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

वाडेबोल्हाईपासून आज सकाळी सुरू झालेला गावभेट दौरा शिरसवडी, भिवरी, अष्टापूर, हिंगणगाव, शिंदेवाडी, सांगवी सांडस, न्हावी सांडस, पिंपरी सांडस, बुर्केगाव, डोंगरगाव, पेरणे, वढू, फुलगाव, तुळापूर, लोणीकंद त्यानंतर सायंकाळी वाघोली येथे जाहीर सभा घेण्यात आली.या वेळी माजी आमदार अशोक पवार, 
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, महिलाध्यक्षा लोचन शिवले, कल्पना जगताप व मान्यवर दौऱ्यात सहभागी होते.

पेरणे येथे बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘शंभूराजांनंतर जशी रयत लढली, तसेच शिरूर मतदारसंघातील जनतेने आपलेपणाने माझ्यावर विश्वास टाकून मला अक्षरशः खांद्यावर घेतले आहे; म्हणून ही लढत राज्यात लक्षवेधी ठरली आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत माझा नुकताच राज्याभिषेक झाला असून, येत्या २९ तारखेला माझे मतदार बंधू, माता-भगिनी माझा खराखुरा राज्याभिषेक करतील. वढू, तुळापूरचा विकास हाच माझा ध्यास असून, सर्वांगीण विकास आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे हात मजबूत करण्यासाठी विकासाला मत द्या. यंदा धनुष्य नाही; तर मनुष्य पाहा.’

Web Title: Loksabha Election 2019 Amol Kolhe Rajyabhishek Politics