Loksabha 2019 : भाजपमुळे देश अस्थिर - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

भाजपकडून ग्रामीण अर्थकारण उद्‌ध्वस्त 
‘भाजपला पाच वर्षांत एकही कारखाना उभा करता आला नाही. उलट काँग्रेस, राष्ट्रवादीने सहकाराच्या माध्यमातून मजबूत केलेले ग्रामीण अर्थकारण उद्‌ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केले. त्यामुळे तुमच्या हिताची जपणूक करणाऱ्या महाआघाडीच्या हातात सत्ता द्या,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर येथे केले.

बारामती - ‘भाजप सरकारने पाच वर्षांत अनेक चुकीचे निर्णय घेऊन अस्थैर्य निर्माण करण्याचे काम केले. या देशाला आता स्थिर सरकारची आणि स्थैर्याची गरज आहे. नागरिकांमधील अस्वस्थता दूर करण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी जनतेने उभे राहावे,’’ असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी (ता. २१) बारामतीत झाली, त्याप्रसंगी पवार बोलत होते.

याप्रसंगी पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, ‘‘राज्यातील प्रश्नांबाबत, तसेच विकासाच्या मुद्द्यांबाबत न बोलता केवळ पवार आणि गांधी कुटुंबावर टीका करणे इतकेच काम या दोघांनी केले. आमच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या; मात्र गेल्या पाच वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही परिस्थिती बदलायची असेल, तर कर्जमुक्तीची गरज आहे. ही कर्जमुक्ती काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार देईल.’’

‘एकीकडे बड्या उद्योजकांची कर्जमाफी करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत का?’’ असा सवाल करत पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. ‘‘माझे बोट धरून राजकारणात आले, असे मोदी सांगत आहेत आणि दुसरीकडे ते बेधडकपणे खोटे बोलतात. मला तर आता याची भीतीच वाटू लागली आहे. आता मी डॉक्‍टरांकडे जाऊन माझ्या बोटाचीच तपासणी एकदा करून घेणार आहे,’’ अशी मिस्कील टिप्पणी पवार यांनी या वेळी केली. 

अमित शहा यांनी बारामतीत येऊन पवार यांच्यावर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला.

Web Title: Loksabha Election 2019 BJP India Instable Sharad Pawar Speech Politics