Loksabha 2019 : दांपत्याच्या नावावर पुन्हा बोगस मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

बिबवेवाडी येथील मतदान केंद्रावर एका दांपत्याच्या नावाने दोघांनी बोगस मतदान केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यामध्ये दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने तपास करण्याचा आदेश दिला आहे.

पुणे - बिबवेवाडी येथील मतदान केंद्रावर एका दांपत्याच्या नावाने दोघांनी बोगस मतदान केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यामध्ये दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने तपास करण्याचा आदेश दिला आहे.  

याप्रकरणी दिनेश भुवनेंद्र अग्रवाल (वय ४७, रा. गंगाधाम सोसायटी, मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अग्रवाल हे टेक महिंद्रा कंपनीमध्ये प्रोग्रॅम मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजता अग्रवाल व त्यांच्या पत्नी बिबवेवाडीतील राज्य कामगार विमा महामंडळाजवळील पंचदीप भवनमधील बूथ क्रमांक २८७ मध्ये मतदान करण्यासाठी गेले. त्या वेळी तेथे गेल्यानंतर अग्रवाल दांपत्याच्या नावावर एका अनोळखी पुरुषासह एका महिलेने मतदान केल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे अग्रवाल यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी हा प्रकार थेट पोलिसांसमोर मांडला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील, पोलिस निरीक्षक एस. एस. निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. 

दुसऱ्यांदा बोगस मतदान
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीतही फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावाने दोन अनोळखी व्यक्तींनी बोगस मतदान केले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे दाद मागितली.पत्नी व मी मतदानासाठी गेल्यानंतर आमच्या नावावर इतर व्यक्तींनीच मतदान केल्याचे आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले, असे दिनेश अग्रवाल यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Bogus Voting Couple Bibwewadi