Loksabha 2019 : ब्रॉडगेज मेट्रोने पुणे जोडणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

गडकरी म्हणाले....

  • पुण्याचे अनेक प्रश्‍न सुटले. साथ द्या, एअर बसची वाहतूकही सुरू करू.
  • तुम्ही जिवंत असेपर्यंत रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, अशी कामे केली. 
  • मी जलमार्ग बांधला नसता, तर प्रियांका गांधी बोटीतून प्रवास करू शकल्या नसत्या.

पुणे - 'आमचे सरकार आल्यास सोलापूर, नगर, कोल्हापूर आणि लोणावळा हे सर्व मार्ग पुण्याशी १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोने जोडणार आहे. यामुळे या सर्व ठिकाणी एक ते दोन तासांत जाता येईल. नागपूरही मी ब्रॉडगेज मेट्रोने जोडत आहे. हा माझा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. 

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर, कोथरूड आणि महात्मा फुले मंडई येथे गडकरी यांच्या जाहीर सभा झाल्या, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार प्रदीप रावत, आमदार विजय काळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, मुरलीधर मोहोळ, शिवेसेनेचे उपनेते शशिकांत सुतार, चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, ‘‘काँग्रेस विकास करू शकत नाही, त्यामुळे जात, धर्म, वंश यावर ते मते मागतात. देश समृद्ध करणाऱ्या, विकासाची नवी आर्थिक धोरणे राबविणाऱ्या सकारला मत द्यायचे की त्यांना, हे तुम्ही ठरवा. गेल्या साठ वर्षांत काँग्रेसला ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना विकास करता आला नाही. त्यांनी देशाचा सत्यानाश केला. पंडित नेहरूंचा पणतूही गरिबी हटावचा नारा देत आहे. पण एवढ्या वर्षांत फक्त काँग्रेसच्या चेल्याचपेट्यांचीच गरिबी हटली.’’ 

‘देशात पैशांची कमी नाही. कामे करण्यासाठी कणखर नेतृत्व पाहिजे. सिंचन प्रकल्पांचे पैसे ॲडव्हान्स घेऊन काँग्रेस- राष्ट्रवादीने सिंचन प्रकल्प रखडवले होते. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना १४ हजार कोटी रुपये देऊन हे प्रकल्प सुरू केले आहेत. पन्नास टक्के सिंचन क्षमता झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. मोदी सरकारचे नवीन आर्थिक धोरण, राष्ट्रवाद विचारामागे सर्वसामान्यांचा विकास हा केंद्रबिंदू आहे,’’ असे गडकरी यांनी सांगितले. 

बापट म्हणाले, ‘‘महायुतीने सामान्य घरातील कार्यकर्त्यांना मोठे केले; पण काही लोकांना असे वाटते, की या देशाचा सात- बारा आपल्याच नावावर आहे. जिल्हा आपल्या कुटुंबीयांची कमाई वाटते. म्हणून उमेदवार उभे करण्यापासून ते संस्थांच्या जमिनी गिळंकृत करण्यापर्यंतचे काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले.’’

आकडेवारी शिरोळेंकडे देऊन जातो
‘मी विकास केल्याचे आकडे सांगतो; पण मी खोटे बोलत नाही. जे करतो, तेच सांगतो, कोणाला मी खोटे बोलत आहे, असे वाटत असेल; तर ही आकडेवारी मी अनिल शिरोळेंकडे देऊन जातो’ असे गडकरी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Broad Gauge Metro Pune Girish Bapat Politics