Loksabha 2019 : जनता वसाहतीमध्‍ये काँग्रेसची रॅली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ बुधवारी सकाळी सहकारनगर आणि जनता वसाहत परिसरात रॅली काढण्यात आली. नगरसेवक आबा बागूल, अर्चना हणमघर, प्रिया गदादे, विनायक हणमघर, अश्‍विनी कदम, अभय छाजेड, बाळासाहेब दाभेकर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

पुणे - ‘सब की खुशी... मोहन जोशी’, ‘एकच वादा... मोहनदादा’, ‘आला रे आला पंजा आला’ अशा घोषणा देत डोक्‍यावर टोप्या आणि पक्षाचा झेंडा हातात घेतलेली रॉली जनता वसाहतीच्या गल्लीबोळातून फिरत होती. ढोलीबाजाच्या तालावर नाचणारी छोटी पोरे, रॅली दारात आल्यानंतर उमेदवाराला ओवाळणाऱ्या महिलावर्गामुळे जनता वसाहतीतील वातावरण काँग्रेसमय झाले होते.

काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ बुधवारी सकाळी सहकारनगर आणि जनता वसाहत परिसरात रॅली काढण्यात आली. नगरसेवक आबा बागूल, अर्चना हणमघर, प्रिया गदादे, विनायक हणमघर, अश्‍विनी कदम, अभय छाजेड, बाळासाहेब दाभेकर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. सकाळी दहा वाजता गजानन महाराज मंदिरापासून रॅलीला सुरवात झाली.

हिरव्या रंगाच्या आणि त्यावर काँग्रेसची निशाणी, पक्षाचे नेते आणि पुढील बाजूस लावलेला मोहन जोशी यांचा कटाआउट अशा जीपमधून रॅलीला सुरवात झाली. ढोलीबाजाच्या तालावर निघालेल्या या रॅलीत डोक्‍यावर तिरंगी टोप्या, गळ्यात मफलर आणि हातात झेंडा घेऊन मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या.

जागोजागी फुलांचा वर्षाव रॅलीवर केला जात होता. चौकाचौकांत फटक्‍यांची आतषबाजी, मंडळांकडून होणारे सत्कार, दारात आलेल्या उमेदवारांचे महिलांकडून होणारे औक्षण अशा वातावरणात ही रॅली जनता वसाहतीतील गल्लीबोळातून फिरत होती. तळपत्या उन्हातून फिरणाऱ्या रॅलीतील कार्यकर्त्यांना जागोजागी नागरिकांकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी सुरू झालेली ही रॅली दुपारी दोन वाजता दांडेकर पूल या ठिकाणी समाप्त झाली. सायंकाळी चार वाजता बोपोडी येथील मानाजी बाग येथून पुन्हा प्रचार रॅलीला सुरवात झाली.

मोहनदादांना दिले टायगर बिस्किट 
रॅली जनता वसाहतीत एका चौकात पोचली. त्या ठिकाणी औक्षण झाल्यानंतर महिलांनी मोहनदादांना साखर दिली. दादांनी ती जीपमध्ये मागे असलेल्या कार्यकर्त्यांच्या मुखात भरली. तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या एका स्वस्त धान्य दुकानदाराने दादांना टायगर बिस्किटाचा पुडा दिला. दादांनीही तो फोडून बिस्किट तोंडात टाकले आणि मार्गस्थ झाले.

Web Title: Loksabha Election 2019 Congress Rally Mohan Joshi Politics