Loksabha 2019 : लोकशाहीसाठी आघाडीचे सरकार हवे - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 April 2019

‘भाजपच्या काळात शेतकरी दुःखी झाला असून, मागील दोन वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भाजपची भूमिका लोकशाहीला बाधक असून, लोकशाही टिकवायची असेल; तर देशात भाजपशिवाय महाआघाडीच्या एकसंध विचाराची सत्ता आणावी,’’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

भोर - ‘भाजपच्या काळात शेतकरी दुःखी झाला असून, मागील दोन वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भाजपची भूमिका लोकशाहीला बाधक असून, लोकशाही टिकवायची असेल; तर देशात भाजपशिवाय महाआघाडीच्या एकसंध विचाराची सत्ता आणावी,’’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

येथील यशवंत मंगल कार्यालयात बारामती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, संपतराव जेधे, कृष्णाजी शिनगारे, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, यशवंत डाळ, भालचंद्र जगताप, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे, नितीन धारणे, विठ्ठल शिंदे, लहू शेलार, विठ्ठल आवाळे, श्रीधर किंद्रे, शिवाजी कोंडे, गणेश खुटवड, सुनीता बाठे, तृप्ती खुटवड, वंदना धुमाळ, मंगल बोडके आदींसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘मोदी हे देशातील वाढलेल्या बेरोजगारी व विकासाचे न बोलता केवळ गांधी आणि पवार यांच्यावरच टीका करीत आहेत. जो माणूस एकटा आहे तो आमच्या कुटुंबाची काळजी करतो, अशी टिप्पणी करीत भोर-वेल्ह्यातील मावळे हे लाचार नसून, कुठल्याही परिस्थितीत उपाशी राहतील; पण भीक मागणारे नाहीत. त्यामुळे विरोधकांनी कितीही प्रलोभने दाखवली, तरीही आघाडीच्या सुप्रिया सुळे विजयी होतील,’’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमदार संग्राम थोपटे यांनी राहुल गांधी यांच्या आदेशानुसार आम्ही स्थानिक पातळीवरील मतभेद विसरून देशाच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे सुप्रिया सुळे विजयी होऊन केंद्रात आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुप्रिया सुळे यांनी तालुक्‍यातील ऐतिहासिक राजकीय किल्ल्यांचे पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करणार असल्याचे सांगितले. भोर-वेल्हे-मुळशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या वारसांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला. सुधीर कोठावळे यांनी सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Democracy Aghadi Government Sharad Pawar Politics