Loksabha 2019 : सुदृढ लोकशाहीसाठी मतदान गरजेचे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

उमेदवार हा सामान्य कुटुंबातील असावा, लोकप्रतिनिधी हा युवा असला पाहिजे, बेरोजगारी कमी करण्यासाठी जे प्रयत्नशील असतील त्यांनाच आपण निवडून दिले पाहिजे. अशा प्रतिक्रिया नवमतदारांनी दिल्या आहेत.

पुणे - उमेदवार हा सामान्य कुटुंबातील असावा, लोकप्रतिनिधी हा युवा असला पाहिजे, बेरोजगारी कमी करण्यासाठी जे प्रयत्नशील असतील त्यांनाच आपण निवडून दिले पाहिजे. अशा प्रतिक्रिया नवमतदारांनी दिल्या आहेत.

कोमल घुगे - लोकशाहीला भक्‍कम ठेवण्यासाठी मतदान अत्यंत गरजेचे आहे. मतदान केवळ अधिकार नसून ती आपली जबाबदारी आहे. आपला देश हा सर्वाधिक युवा लोकसंख्येचा देश आहे. मतदारांमध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, या निवडणुकीत त्यांचे प्रश्‍न केंद्रस्थानी असले पाहिजेत. सध्या बेरोजगारीची समस्या मोठी आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी जे प्रयत्नशील असतील त्यांनाच आपण निवडून दिले पाहिजे. लोकप्रतिनिधी हा युवाच असला पाहिजे.

ऋतीक कोकाटे - उमेदवार राजकारणातील प्रस्थापित नसून तो सामान्य कुटुंबातील असावा. सामान्य नागरिकांच्या प्रश्‍नांची त्याला जाण असली पाहिजे. सामान्य नागरिकांमध्ये मिसळणारा असावा. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आग्रही असणारा हवा आहे. कामाचे प्रदर्शन करीत फक्त श्रेय घेणारा उमेदवार नको. त्यामुळे मतदान करताना या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच मतदान करणार आहे.

साक्षी खरे - प्रथम मतदान करण्यासाठी खूप उत्साही आहे. आपण निवडून देणारा खासदार हा सर्वांगीण विकास करणारा असावा. त्यांनी गरीब नागरिकांचे प्रश्‍न सोडविले पाहिजेत. पाण्याचा प्रश्‍न, पर्यावरणाचा प्रश्‍न गांभीर्याने घेतला पाहिजे. नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करण्याची गरज आहे. तो उच्चशिक्षित आणि महिलांचे प्रश्‍न सोडविणारा असावा. 

अथर्व नेत्रगावकर - मतदानाकडे एक जबाबदारी आहे. मतदानातून आपण ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. राजकीय पक्ष, त्यांच्यातील वाद-विवाद यापलीकडे जाऊन राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे.

Web Title: Loksabha Election 2019 Democracy Voting I Will Vote