Loksabha 2019 : आधी लग्न लोकशाहीचे...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 एप्रिल 2019

ती उच्चशिक्षित... आंतरराष्ट्रीय बॅंकेत सहायक व्यवस्थापिका... काल आंतरजातीय विवाह केला आणि आज पतीकडील चालीरीतीनुसार सासरी गेली... पण, मतदानाचा हक्क बजावून. दीक्षा मिरजकर-मनवानी असे तिचे नाव.

पिंपरी - ती उच्चशिक्षित... आंतरराष्ट्रीय बॅंकेत सहायक व्यवस्थापिका... काल आंतरजातीय विवाह केला आणि आज पतीकडील चालीरीतीनुसार सासरी गेली... पण, मतदानाचा हक्क बजावून. दीक्षा मिरजकर-मनवानी असे तिचे नाव.

निगडीतील यमुनानगर येथील दीक्षा मिरजकर यांनी विज्ञान शाखेतून संगणक विषयात पदव्युत्तर पदवी (एम. एस्सी. कॉम्पुटर) प्राप्त केली आहे. सध्या त्या अमेरिकन बॅंकेच्या पुण्यातील शाखेत (खराडी) सहायक व्यवस्थापिका आहेत. त्यांचे पती दीनेश मनवानी हे एमबीए झाले आहेत. ते जर्मन बॅंकेच्या पुणे शाखेत (औंध) वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. दीक्षा यांचे वडील प्रकाश मिरजकर एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मनुष्यबळ व्यवस्थापक होते. ते म्हणाले, ‘‘माझी पत्नी सिंधी समाजातील आहे. आमच्या विवाहाला ३५ वर्षे झालीत. मोठ्या मुलीचा आंतरजातीय विवाह (अरेंज मॅरेज) लावून दिला आहे. पत्नी सिंधी समाजातील असल्याने एक तरी जावई सिंधी असावा म्हणून विवाह जुळविणाऱ्या एका संस्थेच्या संकेतस्थळावरून दिनेश यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून रविवारी विवाह लावून दिला. सिंधी समाजाच्या रिवाजानुसार आज (सोमवारी) मुलीला सासरी पाठविले. त्यापूर्वी तिने मतदान करून कर्तव्य बजाविल्याचे समाधान आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Marriage Diksha Manwani Voting