Loksabha 2019 : घाटाखालीच लक्ष केंद्रित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

मंगळवारनंतर जोर वाढणार?
पुणे आणि बारामती मतदारसंघांसाठी येत्या मंगळवारी (ता. २३) मतदार होणार आहे. त्यामुळे पक्षांचे नेते सध्या त्या ठिकाणी प्रचार करीत आहेत. तेथील मतदान संपल्यानंतर शहरातील प्रचाराचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे. पार्थ पवार यांचा प्रचारासाठी या दोन्ही भागांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मावळात येणार असल्याचे समजते.

पिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळ मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची पर्यायाने लक्षवेधक ठरली आहे. मावळसाठी २९ एप्रिल रोजी मतदान आहे. त्यादृष्टीने प्रचारासाठी केवळ नऊच दिवस राहिले आहेत. मात्र शहरात अजूनही या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा जोर दिसून येत नाही. आतापर्यंत या दोन्ही उमेदवारांनी घाटाखालील भागांतच प्रचार करण्यावर भर दिला आहे.

मावळ मतदारसंघात घाटाखालील उरण, कर्जत आणि पनवेल हा भाग येतो. तेथील मतदारांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी तेथेच प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित केले असून, त्यातही व्यक्‍तिगत गाठीभेटींवर त्यांनी जास्त भर दिल्याचे दिसून येते. 

शहरात पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत वाल्हेकरवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची, तर खासदार उदयनराजे भोसले यांची निगडी प्राधिकरणात सभा झाली आहे. खेरीज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भक्ती-शक्ती चौक ते दापोडी, अशी रॅली काढली होती. मात्र श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अजूनपर्यंत एकही मोठी सभा झालेली नाही. 

एलईडी व्हॅनद्वारे प्रचार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली नसली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात अनेक ठिकाणी भाषणे देत आहेत. त्याच्या चित्रफिती एलईडी व्हॅनमधून शहराच्या विविध भागांत दाखविण्यात येत आहेत. प्रामुख्याने बस स्थानक, चौक, रहदारीच्या रस्त्यांवर या व्हॅन फिरताना दिसत आहेत. युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी तयार केलेल्या व्हॅनमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या भाषणांच्या चित्रफिती दाखविल्या जात आहेत. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठीही दोन एलईडी व्हॅन तयार करण्यात येत असून, पुण्यात त्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत त्या शहरातील रस्त्यांवर फिरताना दिसणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Maval Constituency Politics Shrirang Barne Parth Pawar