Loksabha 2019 : बारणे एकाकीच?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

बैठकीला गैरहजर नगरसेवक
महायुतीच्या संयुक्त बैठकीला बाळासाहेब ओव्हाळ (वाल्हेकरवाडी), सचिन चिंचवडे (चिंचवड), मोना कुलकर्णी (चिंचवड), अभिषेक बारणे (थेरगाव), कैलाश बारणे (थेरगाव), माया बारणे (थेरगाव), सचिन बारणे (थेरगाव), मनीषा पवार (थेरगाव), झामाबाई बारणे (थेरगाव), ममता गायकवाड (वाकड), तुषार कामठे (पिंपळे निलख), चंद्रकांत नखाते (रहाटणी), बाबा त्रिभूवन (रहाटणी), बापू काटे (पिंपळे सौदागर), माधवी राजापुरे (पिंपळे गुरव), उषा ऊर्फ माई ढोरे (जुनी सांगवी), हर्षल ढोरे 
(जुनी सांगवी), संतोष कांबळे (जुनी सांगवी), जयश्री गावडे (चिंचवड), शिवसेनेचे राहुल कलाटे (वाकड) अमित गावडे (प्राधिकरण), मीनल यादव (मोहननगर), अश्‍विनी वाघमारे (वाकड) यांनी दांडी मारली. त्यांचे काही वैयक्तिक कारण असू शकते; परंतु मनोमिलनाच्या इतक्‍या मोठ्या निर्णयानंतर होणाऱ्या बैठकीला तब्बल २४ नगरसेवकांनी गैरहजर राहणे, हा धोक्‍याचा इशारा आहे. 

पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यातील मनोमिलन केवळ त्यांच्यापुरतेच मर्यादित दिसत आहे. जगताप समर्थक भाजपचे १९ व बारणे यांच्यावर नाराज शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी महायुतीच्या संयुक्त बैठकीला दांडी मारली. यामुळे भाजप व शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीसमोर आल्याने बारणे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

मावळमधील शिवसेनेचा उमेदवार बदलावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह समर्थक नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने ‘मावळचा गड’ जिंकावा, अशी ‘गळ’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगतापांना घातली. त्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद व संयुक्त बैठक झाली. बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. या सर्व घडोमोडीत जगताप यांची हजेरी होती. मात्र, त्यांचे समर्थक नगरसेवक व कार्यकर्ते अद्यापही नाराज आहेत. बारणे यांची कार्यशैली त्यांना पसंत नाही. ‘ज्याच्या विरुद्ध आपण पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली, त्याचाच प्रचार करायचा’ हे सूत्र त्यांना रूचलेले नाही. ‘भाऊंनी (जगताप) आमचा वापर केला. मनोमिलनापूर्वी आमच्याशी चर्चा केली नाही. विश्‍वासात घेतले नाही,’ असा विरोधी सूर आहे. 

नाराजांचा कानोसा
महायुतीतील नाराजांचा कानोसा घेतला असता खदखद ऐकायला मिळाली. लोकसभा निवडणुकीसाठी महायुती होण्यापूर्वी ‘बारणे’ आडनावाचे पाच, शिवसेनेचे चार आणि जगताप समर्थक नगरसेवकांनी लेखी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. ‘कोणत्याही परिस्थितीत श्रीरंग बारणे यांना मावळमधून उमेदवारी देऊ नये. ते निवडून येऊ शकणार नाहीत. ही जागा भाजपसाठी सोडावी व लक्ष्मण जगताप यांना तिकीट द्यावे,’ अशी मागणी केली. बारणे यांचे काम आम्ही करणार नाही, असा इशाराही दिला होता. दरम्यान, जगताप आक्रमक झाले. भाजपचे कोणीही प्रचारात सक्रीय नव्हते. ‘एकला चलो रे’ अशी बारणे यांची भूमिका होती. प्रचारात जोर नव्हता. याउलट राष्ट्रवादीची स्थिती होती. अजित पवार यांनी पक्षातील सर्व गटतट मोडून सर्वांची मोट बांधली. २०१४ च्या निवडणुकीत जगतापांबरोबर असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची साथ मिळवली. काँग्रेसचा सामर्थ्यवान ‘हात’ मिळविला. आठवले गट वगळता रिपब्लिकनचे गवई, कवाडे गट आपल्याकडे खेचले. उमेदवार पार्थ पवार यांचा झंझावत सुरू झाला. यामुळे शिवसेना श्रेष्ठींच्या पायाखालची वाळू सरकली. जगताप यांचे मन वळविण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत आले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ‘हाक’ दिली. मात्र, जगतापांनी ‘दाद’ दिली नाही. अखेर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले. जगतापांना नमते घ्यावे लागले. मात्र, त्यांचे समर्थक अद्याप प्रचारापासून दूरच आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Maval Constituency Shrirang Barne Politics