Loksabha 2019 : उन्हाइतकाच तापतोय प्रचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

डोक्‍यावर रणरणते ऊन, अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा, गल्लीबोळातील मतदारांपर्यंत पोचणारे कार्यकर्ते, नेते आणि उमेदवार. त्यासाठी कोणाची पदयात्रा, तर कोणाची वाहन फेरी, असे चित्र रविवारी (ता. ७) लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिसून आले. सार्वजनिक सुटीचे निमित्त साधून मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी वाहन फेरी काढून, तर शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पदयात्रा व बैठका घेऊन मतदारांशी संपर्क साधला.

पिंपरी - डोक्‍यावर रणरणते ऊन, अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा, गल्लीबोळातील मतदारांपर्यंत पोचणारे कार्यकर्ते, नेते आणि उमेदवार. त्यासाठी कोणाची पदयात्रा, तर कोणाची वाहन फेरी, असे चित्र रविवारी (ता. ७) लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिसून आले. सार्वजनिक सुटीचे निमित्त साधून मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी वाहन फेरी काढून, तर शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पदयात्रा व बैठका घेऊन मतदारांशी संपर्क साधला. उन्हाची पर्वा न करता दोन्ही उमेदवारांचे समर्थक कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले.

शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सकाळी पिंपळे सौदागर, वाकड परिसरातील आयटी कर्मचाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. या भागातील हाउसिंग सोसायट्यांना भेट दिली. प्राधिकरणातील युतीच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावली. होम हवनात सहभाग घेऊन भाविकांशी संवाद साधला. 

पवार पिता-पुत्रांची दुचाकी फेरी
निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूहापासून सकाळी अकराच्या सुमारास संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पवार पिता-पुत्रांनी पुष्पहार अर्पण केला. कार्यकर्त्यांच्या डोक्‍यावर पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या व हातात झेंडे होते. काचघर चौक, भेळ चौक, एलआयजी कॉलनी, आकुर्डी रेल्वेस्थानक, टिळक चौक, काळभोरनगर, एम्पायर इस्टेट, आनंदनगर, मोहननगर, मोरवाडी न्यायालय असा भाग पिंजून काढला. दापोडीत सांगता झाली. कार्यकर्ते विजयाच्या घोषणा देत होते. त्यामुळे परिसर दणाणून गेला. पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी शहराध्यक्ष योगेश बहल, फझल शेख, काँग्रेसचे 
शहराध्यक्ष सचिन साठे आदी सहभागी झाले होते.

रिपब्लिकन पक्ष-शिवसेना बैठक  
भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी (ता. ७) पिंपरीत बैठक झाली. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांना अधिकाधिक मतदान करून विजयी करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला.

युती-आघाडीकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी
युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे व आघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या वेळी शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी दोघांनीही केली आहे. सकाळी अकरा वाजता पार्थ अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी, वाहन फेरी निघेल. दुपारी एक वाजता बारणे उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्याअगोदर म्हाळसाकांत चौकापासून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत (प्राधिकरण कार्यालय) वाहन फेरी निघेल. दोन्ही उमेदवारांकडून अर्ज भरण्याअगोदर मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन होणार आहे. त्याच्या तयारीला कार्यकर्ते व पदाधिकारी लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Parth Pawar NCP Rally Publicity Politics