Loksabha 2019 : पार्थ विरुद्ध बारणेच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मार्च 2019

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार कोण असणार? श्रीरंग बारणे यांना पुन्हा संधी मिळणार का? याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, शिवसेनेकडून अखेर बारणे यांची उमेदवारी शुक्रवारी (ता. २२) जाहीर झाली आणि मावळातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले.

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार कोण असणार? श्रीरंग बारणे यांना पुन्हा संधी मिळणार का? याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, शिवसेनेकडून अखेर बारणे यांची उमेदवारी शुक्रवारी (ता. २२) जाहीर झाली आणि मावळातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षांच्या जागा वाटपात मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रावादीकडे तर, भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे आहे. राष्ट्रवादीतर्फे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची नावे चर्चेत होती. अखेर पार्थ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर खुद्द शरद पवार यांनी चिंचवड येथे गेल्या आठवड्यात जाहीर सभा घेतली. त्यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. मात्र, शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर होत नव्हती. भाजपच्या एका गटाने बारणे यांच्या नावाला विरोध केला होता.

अशा परिस्थितीत दोन दिवसांपूर्वी भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पालकमंत्री गिरीश बापट यांनी संवाद साधला. त्यानंतर शिवसेनेने उमेदवार जाहीर न केल्याने उमेदवार कोण? विद्यमान खासदार बारणे यांना पुन्हा संधी मिळणार की, नवीन उमेदवार मिळणार? याबाबत चर्चा होती. शिवाय भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकडेही अनेकांचे लक्ष होते. मात्र, शिवसेनेने शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत बारणे यांच्या नावाची घोषणा केल्याने चर्चा थांबली आणि पार्थ पवार व बारणे यांच्यातच थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

उमेदवारांची पूर्वतयारी
पार्थ पवार यांनी उरण, पनवेल, कर्जतसह पिंपरी, चिंचवड व मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी चार महिन्यांपासूनच सुरू केलेल्या होत्या. त्यांना शेकाप, काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष व मित्र पक्षांची साथ मिळाली आहे. बारणे यांनीही तयारी सुरू केली होती. मात्र, भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची खंबीर साथ त्यांना हवी होती. त्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री बापट यांनी संयुक्त बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Parth Pawar Shrirang barane Politics