Loksabha 2019 : कोथरूड ठरणार किंगमेकर...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

परंपरागत मते कुणाकडे?
पुणे शहरात भाजपची तीन ते सव्वातीन लाख परंपरागत मते मानली जातात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मिळून हीच व्होट बॅंक चार ते सव्वाचार लाखांची मानली जाते. १९९९ ते २००९ च्या निवडणुकांमध्ये जेव्हा दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढल्या तेव्हा भाजपने ९९ मध्ये विजय मिळविला. २०१४ च्या मोदी लाटेत भाजपला ५ लाख ६९ हजार मते मिळाली होती. म्हणजे, पारंपरिक मतांना नव्या ३ लाख १५ हजार मतदारांची साथ भाजपला मिळाली होती. ती साथ यंदा राहणार का, हा आजच्या मतदानानंतरचा कळीचा मुद्दा आहे.

पुणे - कोणतीही लाट नसलेली ही निवडणूक खऱ्या अर्थाने पुणे शहरातील भाजप- काँग्रेसची व्होट बॅंक निश्‍चित करणारी ठरणार आहे, त्यावर पुण्याचा कारभारी निश्‍चित होणार आहे. २०१४ मधील निवडणूक वगळता सरधोपट विचार केला, तर पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि भाजपच्या बाजूने झुकणारे प्रत्येकी तीन मतदारसंघ दिसतात. मात्र गेल्या निवडणुकीत सर्वच मतदारसंघांनी भाजपला साथ देत काँग्रेसला ‘हात’ दाखविला होता.

विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची यंदाची टक्केवारी पाहिली, तर कोथरूड पुण्याचे भवितव्य ठरवणार, असे दिसते.

कोथरूड नेहमीच युतीचा; विशेषतः भाजपचा बालेकिल्ला राहिला. गेल्या निवडणुकीत कोथरूडने भाजपला जवळपास लाखाचे मताधिक्‍य दिले. यंदा मतदानाची टक्केवारी घसरली असली, तरी भाजपला किती मतांची आघाडी मिळणार त्यावर पुढची गणिते ठरतील. गेल्या निवडणुकीत उर्वरित मतदार संघांनी भाजपला पन्नास हजारांपेक्षा कमी मताधिक्‍य दिले होते. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघात सुमारे ५६ टक्के मतदान झाले होते. या वेळी सुमारे ४८ टक्केच मतदान झाले. वडगाव शेरी मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ५० टक्के मतदान झाले होते. तेथे पाच वर्षांत ६४ हजार मतदार वाढूनही यंदाचे मतदान साधारण तेवढेच राहिले. पर्वती विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत सुमारे ५५ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र मतदानात साधारण एक टक्‍क्‍यावर घट झाली. 

भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा कसबा हक्काचा विधानसभा मतदारसंघ. तेथे गेल्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात २७ हजारांनी मतदार वाढले; मात्र मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणावर घसरला. शिवाजीनगरचा मतदानाचा टक्का सुमारे सहा टक्‍क्‍यांनी, तर पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सुमारे एक टक्‍क्‍याने घसरला.

मतदानाची घसलेली टक्केवारी कोणच्या पथ्यावर पडणार, हा औत्सुक्‍याचा विषय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Pune Constituency Kothrud Kingmaker Politics