Loksabha 2019 : सभा, रोड शोद्वारे प्रचाराचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

असा रंगला प्रचार...  

  • नेत्यांच्या जाहीर सभा आणि शक्तिप्रदर्शन करणारे रोड शो
  • पहिल्या आठवड्यात प्रचार यंत्रणा राबविणे, नाराजांची मनधरणी, सभांचे नियोजन यावर भर
  • या आठवड्यात प्रत्यक्ष रस्त्यावरचा आणि सोशल माध्यमांद्वारे प्रचारावर जोर 
  • अखेरच्या दोन दिवसांत प्रमुख राजकीय नेत्यांच्या सभांचे आयोजन 

पुणे - पुणे आणि बारामती लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी सायंकाळी प्रचाराची सांगता होत असल्याने शनिवारी आणि रविवारी शहरात प्रमुख राजकीय नेत्यांच्या सभा, पदयात्रा, दुचाकी रॅली असा प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

भाजप आघाडीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या खडकवासला मतदारसंघात राज ठाकरे यांची सभा झालेल्या ठिकाणीच सिंहगड रस्त्यावर तसेच कोथरूडमधील भेलकेनगर येथे जाहीर सभा होणार आहे. रविवारी गडकरी यांची शिवाजीनगर आणि महात्मा फुले मंडई येथे सभा होऊन भाजपच्या प्रचाराची सांगता होणार आहे. त्याआधी विधानसभेच्या सहाही मतदारसंघात दुचाकी रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. 

काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा रोड शो शनिवारी होत आहे. वडगाव शेरी, चंदननगर येथून त्यास सकाळी नऊ वाजता सुरवात होणार असून, ते संपूर्ण शहर पिंजून काढणार आहेत. याशिवाय दुपारी काँग्रेस भवन येथे बहुजन समाजाचा मेळावा होणार असून, त्यास प्रवीण गायकवाड, सुषमा अंधारे, श्रीमंत कोकाटे आदी उपस्थित राहणार आहेत. शेवटच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने रविवारी शहराच्या सहाही भागात रोड शो होणार आहे. 

वंचित आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी रविवारी एसएसपीएमएस मैदानावर ॲड. आंबेडकर आणि खासदार ओवेसी यांची सभा होत आहे. दुपारी दोन वाजता ही सभा होत असून, त्यास माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित राहणार आहेत. ‘बसप’चे उमेदवार उत्तमराव शिंदे यांच्या प्रचारासाठी रविवारी ‘रोड शो’ होणार आहे. शनिवार आणि रविवार असल्याने सर्वच उमेदवारांनी प्रत्येक मिनिटाचे नियोजन करून मतदारांपर्यंत पोचण्याचे नियोजन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Pune Constituency Speech Road Show Publicity Politics