Loksabha 2019 : पुणे, शिरूर, बारामती मतदारसंघात प्रचाराचा झंझावात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

मीच आमदार होणार - बुचके
‘मी मागील वीस वर्षे तालुक्‍यात जिवाचे रान करून शिवसेनेचे काम करत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी राडा तर होणारच. मीच आमदार होणार. वेळ येईल त्या वेळी चिरफाड केली जाईल. पक्षप्रमुखांचा माझ्यावर विश्‍वास असून, मला न्याय मिळणारच,’ अशी भूमिका बुचके ठिकठिकाणच्या सभेत व्यक्त करत आहेत.

शिरूर
नारायणगाव - आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून मनसेचे राज्यातील एकमेव उमेदवार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यामुळे शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके व त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे. त्यातून शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी कोणाला नक्की कोणाला मिळणार? याचीच चर्चा सध्या सुरू आहे.  

सोनवणे यांच्यासोबत बुचके यांचे विरोधक असलेले माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर, नेताजी डोके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वास्तविक लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हवा पाहून शिवसेनेत प्रवेश करण्याचा सल्ला सोनवणे यांना काही कार्यकर्त्यांनी दिला होता. मात्र, आढळराव पाटील यांच्या आग्रहामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकसभेला बळ मिळेल, असे राजकीय गणित होते. मात्र त्यांच्या प्रवेशामुळे बुचके यांच्या समर्थकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. बुचके यांचा राग कमी करण्याचा प्रयत्न आढळराव पाटील यांनी केला. त्या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. शिवजयंतीनिमित्त नारायणगाव, जुन्नर येथे झालेल्या सभेत बुचके यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यांचे कट्टर समर्थक सरपंच योगेश पाटे यांनीसुद्धा, ‘ताई याच पुढील आमदार असतील,’ असे जाहीर वक्तव्य केले आहे.

माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर तालुक्‍यात शिवसेना पक्ष वाढवण्याचे काम बुचके यांनी केले. पंचायत समिती, जुन्नर नगरपालिका, बाजार समितीत शिवसेनेची सत्ता आणण्यात त्यांचेच श्रेय आहे. विधानसभा निवडणुकीत दोन वेळा पराभूत झालेल्या बुचके यांनी मागील चार वर्षांपासून विधानसभेची तयारी सुरू केली होती. मात्र आमदार सोनवणे यांच्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरू आहे.

बारामती
माळशिरस - आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार कुटुंबाच्या विरोधात युतीकडून केवळ औपचारिकता म्हणून उमेदवार दिला जात असे. यामुळे पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काहीअंशी, तर तालुक्‍यातील इतर पक्ष निवडणूक गांभीर्याने घेत नसत. मात्र, या वेळी युतीकडून भाजपच्या कमळ चिन्हावर मतदारसंघातील दौंड तालुक्‍यातील कांचन कुल यांच्या रूपाने मातब्बर उमेदवार दिल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.

पुरंदर तालुक्‍यात या निवडणुकीकडे काँग्रेस व शिवसेनेकडून विधानसभेची पूर्वपरीक्षा म्हणून या निवडणुकी-कडे पाहिले जात आहे.आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना तालुक्‍यातून आतापर्यंतचे विक्रमी मताधिक्‍य देण्यासाठी तालुक्‍यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी आपली पूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी केली आहे. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या मताधिक्‍यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

विधानसभा निवडणुकीवर परिणाम...
लोकसभा निवडणुकीपेक्षा या दोन्ही नेत्यांना पुढील विधानसभा निवडणूक ही महत्त्वाची आहे. या निवडणुकीतील आघाडी व युतीच्या उमेदवारांना तालुक्‍यातून मिळणाऱ्या मतदानाचा पुढील विधानसभा निवडणुकीवर निश्‍चित परिणाम होणार आहे. त्यामुळेच दोन्ही नेत्यांनी  आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

पुणे
पुणे - वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीलाच होईल, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी केली. बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.  

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात तिसरी आघाडी यशस्वी होत नाही. मी सगळ्या आघाड्यांमध्ये जाऊन आलेलो आहे. वंचित आघाडीचा राजकारणावर किंचितही परिणाम होणार नाही. गेल्या वेळी महादेव जानकरांनी कमळ चिन्ह घेतले असते, तर पवारांचा बुरूज ढासळला असता. महायुतीच्या ४० पेक्षा जास्त जागा निवडून येतील, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३७० जागा मिळतील, असा अंदाज आठवले यांनी वर्तविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Pune Shirur Baramati Publicity Politics