Loksabha 2019 : शिरोळे, बापट यांनी आश्‍वासने पूर्ण केली नाहीत - रमेश बागवे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

‘विकास या एकाच मुद्यावर काँग्रेसचा भर असून, गेल्या पाच वर्षांत विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलेले कोणतीही आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत, हे पुणेकरांपुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत,’’ असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

पुणे - ‘विकास या एकाच मुद्यावर काँग्रेसचा भर असून, गेल्या पाच वर्षांत विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलेले कोणतीही आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत, हे पुणेकरांपुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत,’’ असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

काँग्रेस पक्षाने निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या मोहन जोशी यांना उमेदवारी दिली आहे. गेली ४० वर्षे ते शहराच्या राजकारणात आहेत. त्यांचे चारित्र्य स्वच्छ आहे. या आमच्या उमेदवाराच्या जमेच्या बाजू आहेत. याउलट गेल्या पाच वर्षांत शिरोळे यांनी कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळेच भाजपला उमेदवारी बदलण्याची वेळ आली. आता जो उमेदवार पक्षाने दिला आहे, तोसुद्धा तूरडाळ गैरव्यवहारात बदनाम झाला आहे.

पालकमंत्री असताना पाणी, घनकचरा असे शहराचे कोणतेही प्रश्‍न ते मार्गी लावू शकले नाहीत. त्यांना पक्षाने रिंगणात उतरविले आहे; पण पुणेकर त्यांना स्वीकारणार नाहीत, असे बागवे म्हणाले. 

उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाला असला तरी, जोशी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. रॅली, पदयात्रा, मेळावे, कोपरा सभांच्या माध्यमातून ९० टक्के मतदारांपर्यंत आम्ही पोचलो आहोत. बदलाचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मतदार स्लिपा वाटपाचे काम सुरू झाले आहे. प्रत्येक मतदारसंघ, प्रभाग आणि वॉर्डात आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची हाउस-टू-हाउस प्रचारफेरी पूर्ण झाली आहे. युवक काँग्रेसच्या वतीने ‘चलो घर-घर’ अभियानही सुरू आहे. विविध समाजाचे, व्यावसायिकांचे मेळावे पूर्ण झाले आहेत. कोपरासभांना चांगला प्रतिसाद मिळत आहेत. सोशल मीडियाचा स्वतंत्र सेल यापूर्वीच स्थापन झाला असून, त्या माध्यमातून पक्षाची विचारधारा आणि जाहीरनामा पोचविण्याचे काम सुरू आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आनंद शर्मा, कुमार केतकर, नबाब मलिक, हुसेन दलवाई, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह नेत्यांच्या सभांचे नियोजन पक्षाने केले आहे. पुणेकरांना परिवर्तन हवे आहे. ते यंदा झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 ramesh bagwe Anil Shirole Girish Bapat BJP Interview Politics