Loksabha 2019 : कोण होणार पुण्याचा कारभारी?

Loksabha-Result
Loksabha-Result

निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे
पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. 

मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत झालेली कामे या जोरावर आम्हीच विजयी होऊ, असा विश्‍वास भाजपकडून करण्यात येत आहे. तर पाच वर्षांतील भाजपच्या कारभाराला कंटाळलेली जनतेने बदलासाठी कौल दिला आहे, त्यामुळे बदल होणारच, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी येत्या गुरुवारी (ता. २३) होणार आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे करताना आकडेवारी मांडली जाऊ लागली आहे. 

वडगावशेरी, पुणे कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगर हे तिन्हीही मतदारसंघ यंदा काँग्रेसला ‘हात’ देणार, असा विश्‍वास काँग्रेसकडून व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघ यंदा भाजपला फारसे लीड देणार नाही, असा दावाही त्यांच्याकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेतकरी कामगार पक्ष आणि मित्रपक्षांची झालेली मदत, तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांची गेल्या पाच वर्षांतील निराशाजनक कामगिरी व नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली नाराजी याचा फायदा काँग्रेसला मिळेल, असे गणित त्यामागे काँग्रेसच्या नेत्यांकडून मांडले जात आहे. भाजपला मानणारा सोसायट्यांच्या भागात मतदान कमी झाले आहे, हेदेखील यामागे एक कारण असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे. फार मोठ्या मताधिक्‍याने नाही, पण वीस ते पंचवीस हजारांनी आम्ही विजयी होऊ, असा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.

याउलट मोदी लाट २०१४ मधील निवडणुकीप्रमाणे याही वेळी असून, सहाही मतदारसंघात आम्हाला मताधिक्‍य मिळेल, असा विश्‍वास भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी एकट्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून किमान एक ते सव्वालाखाचे मताधिक्‍य गिरीश बापट यांना मिळेल, त्यापाठोपाठ पर्वती विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक लीड मिळेल. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघदेखील आश्‍चर्यकारकरीत्या मताधिक्‍य देईल, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. झोपडपट्ट्यांमध्ये काँग्रेसला मानणारा मतदार मोठा आहे. परंतु वंचित विकास आघाडीकडे ती मते गेल्याने त्यांचा फायदा आम्हालाच होणार आहे.

त्यातच मोदी लाट, गेल्या पाच वर्षांतील केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी, तसेच बापट यांचे काम व जनसंपर्क यामुळे किमान दीड ते दोन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी होण्यास कोणतीच अडचण येणार नाही, असे भाजपच्या नेत्यांकडून ठामपणे सांगण्यात येत आहे.

गेल्या साडेचार वर्षांत संघटनेने केलेले काम, बूथ रचनेवर दिलेला भर, नरेंद्र मोदी यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व, शहरी भागात राबविलेल्या योजना यातून सुजाण मतदार भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळे विजय आमचाच आहे.
- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप

गेल्या पाच वर्षांत भाजप सरकार अपयशी ठरले आहे. नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी, शेतकऱ्यांची झालेली फसवणूक, वाढलेली महागाई हे मतदार विसरलेले नाहीत. त्यांच्या मनातील राग हा मतदानातून दिसून आला आहे. त्यामुळे काँग्रेसचा विजय हा निश्‍चित आहे.
- रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस

मताधिक्‍य वाढणार की घटणार?
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीत शहराच्या इतिहासात या वेळी सर्वाधिक मताधिक्‍याचा विक्रम नोंदवला जाणार की मताधिक्य घटणार, याबद्दल औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. पुणेकरांनी या पूर्वी सर्वाधिक तीन लाख १५ हजार एवढे विक्रमी मताधिक्‍य, तर सर्वात कमी आठ हजारांचे मताधिक्‍य देऊन लोकसभा उमेदवाराला निवडून दिले आहे. 

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला तर, २०१४ च्या निवडणुकीत शहराच्या इतिहासातील सर्वाधिक ३ लाख १५ हजार ७६९ मताधिक्‍य भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे यांना मिळाले होते. तत्पूर्वी काँग्रेसचे उमेदवार बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांना १९८४ मध्ये १ लाख ९८ हजार ३५४ मताधिक्‍य मिळाले होते; तर तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्‍य १९७१ मध्ये काँग्रेसचे उमेदवार मोहन धारिया यांना ९४ हजार ४८८ मतांचे मताधिक्‍य मिळाले होते. 

या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकांतील सर्वांत कमी म्हणजेच ८ हजार १८१ मताधिक्‍य काँग्रेसचे उमेदवार बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांना १९८९ मध्ये मिळाले होते; तर भाजपचे उमेदवार अण्णा जोशी यांना १९९१ च्या निवडणुकीत १६ हजार ९३८ मिळाले होते. 

यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून गिरीश बापट तर काँग्रेस आघाडीकडून मोहन जोशी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांनी विजयी होणार असल्याचे दावा केला आहे. विजयी होणाऱ्या उमेदवाराच्या मताधिक्‍याबाबत विक्रम होणार का अल्पसे मताधिक्‍य मिळणार, या बाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com