पुणे : आव्वाज कुणाचा? आनंदोत्सवाची भाजप-काँग्रेसची तयारी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 May 2019

पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, पार्थ अजित पवार यांच्यासह पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चार जागांसाठी आपले नशीब अाजमावणाऱ्या ९३ उमेदवारांच्या भविष्याचा फैसला उद्या (गुरुवारी) होणार आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत झालेल्या चुरशीच्या लढतींमुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माझा विजय निश्‍चित
शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील माहिती घेतली आहे. अल्पसंख्याक, व्यापारी आदी अनेक समाज घटकांनी भाजपच्या कारभारावर मतपेटीतून नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी केला. 

मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर ते म्हणाले, ‘‘मतदान झाल्यानंतर सहाही विधानसभा मतदारसंघात बूथनिहाय मतदानाची माहिती घेतली. त्यातून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांनाही तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही काँग्रेसचा जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे आमचा विजय निश्‍चित आहे.’’  भाजपचे पुण्यातील उमेदवार यापूर्वी चार लाख मतांनी निवडून येऊ असे सांगत होते. आता भाजपचेच कार्यकर्ते निवडणूक अटीतटीची आहे, असे सांगत आहेत. त्यामुळे निकाल कोणालाही गृहित धरता येणार नाही. भाजपचे उमेदवार आणि केंद्र, राज्य सरकारची कामगिरी याबद्दलची मतदारांची नाराजीची भावना लक्षात घेतली तर, काँग्रेसचा विजय निश्‍चित असून मला मताधिक्‍यही चांगले मिळेल, असेही जोशी यांनी सांगितले.

माझे मताधिक्‍य लाखांत
लोकसभा निवडणुकीत तळागाळातील कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या बळावर आणि मतदारांनी दिलेल्या प्रतिसादामुळे काही लाख मतांनी विजयी होणार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांनी बुधवारी केला.  मतमोजणी गुरुवारी (ता.२३) होणार आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर ते म्हणाले, ‘‘मतदान केंद्रांवर उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांना मतमोजणी कशी होणार, याची माहिती दिली आहे. तसेच मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष कसे ठेवायचे, याचीही माहिती त्यांना दिली आहे. या बाबतची पक्षाच्या कार्यकर्त्यांची तयारी पूर्ण झाली आहे.’’

शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी चर्चा करून आढावा घेतला आहे. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. तसेच प्रचाराचे नियोजनही नेटके होते आणि त्याची अंमलबजावणीही चांगल्या पद्धतीने झाली आहे. मतदारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास असल्याचे प्रचार मोहिमेत अनुभवास आले आहे. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. परिणामी, भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतील. पुण्यातही मला काही लाखांचे मताधिक्‍य मिळेल, असा विश्‍वास बापट यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्ह्यातील चार जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक झाली होती. पुणे शहरात १०.३४ लाख (४९.८४ टक्के), मावळमध्ये १३.६६ लाख (५९.४९ टक्के) शिरूरमध्ये १२.९२ लाख (५९.४६ टक्के), तर बारामतीमध्ये १२.९९ लाख (६१.५४ टक्के) मतदान झाले आहे. यंदा प्रथमच मतदानाच्या वेळी ‘व्हीव्हीपॅट’चा वापर करण्यात आला. पुण्यात भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात थेट लढत होत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने सव्वा तीन लाखाच्या फरकाने काँग्रेसचा पराभव केला होता. या वेळी हेच मताधिक्‍य कायम राहील, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. तर, काँग्रेसच्या वतीने २५ ते ५० हजारांच्या फरकाने भाजपचा पराभव होईल, असे सांगण्यात येत आहे. पुण्यात जिल्ह्याचे पालकमंत्री लोकसभेच्या रिंगणात प्रथमच उतरल्याने ते प्रतिस्पर्धी उमेदवारास कशी टक्कर देतात, याविषयी उत्सुकता आहे. 

बारामती मतदारसंघात प्रथमच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान निर्माण केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन अशी लढत झाली. हा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली. त्याला किती यश मिळणार, हे निकालावरून स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मताधिक्‍य वाढेल, असा दावा करण्यात आला आहे. 
शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हान निर्माण केले आहे. 

शिरूर मतदारसंघात दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार झाल्याने निकालाविषयी उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचा नवा चेहरा जाणकार आढळरावांना टक्कर देणार काय, हे निकालानंतर स्पष्ट होईल. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मावळ मतदारसंघातही अटीतटीची निवडणूक झाली आहे. पार्थ पवार यांच्यारूपाने थेट अजित पवार हेच निवडणुकीच्या मैदानात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. शिवसेनेला भाजपची चांगली साथ मिळाल्याने त्यांच्याकडूनही श्रीरंग बारणे यांच्या विजयाचा दावा करण्यात आला आहे.

आनंदोत्सवाची भाजप-काँग्रेसची तयारी
पुणे - काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांनी पुण्यात आम्हीच जिंकणार आणि जल्लोषही करणार असा दावा केला आहे. काँग्रेसने ढोल ताशांच्या गजरात मोतीचूर लाडू, कंदी पेठे वाटण्याचे नियोजन केले आहे. तर भाजप शहराध्यक्षांनी राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने विजय साजरा करणार असा दावा केला असला तरी कार्यकर्त्यांनी शहरात जोरदार तयारी सुरू केली आहे. 

गुरुवारी काेरेगाव पार्क येथे पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. सकाळी १० नंतर निकालाचे कल येण्यास सुरवात होईल. सर्वच महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मतमोजणीसाठी जाणार नसल्याने पक्ष कार्यालयांमध्ये स्क्रीन लावून मतमोजणी पहाण्याची सुविधा केली जाणार आहे. दुपारनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. 
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘पुण्याची जागा काँग्रेस नक्की जिंकणार आहे. त्यामुळे ढोल ताशांच्या गजरात मोतीचूर लाडू, कंदी पेढा वाटून आम्ही आनंदोत्सव साजरा करू. उद्या काँग्रेस भवनात नाही तर संपूर्ण शहरात काँग्रेस दिवाळी साजरी करणार आहे.’’ 

भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, ‘‘केंद्राच्या योजना व संघटनेच्या बळावर आमचा विजय निश्‍चित आहे. पक्ष कार्यालयात आम्ही गिरीश बापट यांच्या विजयाचा जल्लोष करू. पेढे वाटून आनंद व्यक्त करू, पण राज्यात दुष्काळ असल्याने हा आनंदोत्सव साधेपणाने केला जाईल.’’ 
दरम्यान, भाजप नगरसेवकांनी आपापल्या भागात जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. ठिकठिकाणी निकाल बघण्यासाठी एलईडी स्क्रीन लावले जाणार आहेत. चौकाचौकांत पेढे वाटप केले जाणार आहे. नगरसेवक हेमंत रासने यांनी तब्बल ३५० किलो पेढ्यांची ऑर्डर दिली आहे. देशात भाजप ३५० जागा जिंकणार म्हणून तेवढे किलो पेढे वाटणार असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Result Congress BJP NCP Politics