Loksabha 2019 : मोठ्या मताधिक्‍याने आम्हीच बाजी मारणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

महाराष्ट्रात मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची ठरली आहे. मतदानोत्तर कौल अंदाजामध्येही शिवसेनेचे श्रीरंग बारणे जिंकणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार?, याविषयी ठोस माहिती मिळू शकली नाही. शिवसेना विजयाची हॅट्‌ट्रिक साधणार की शरद पवार यांची तिसरी पिढी लोकसभेत पोचणार, याचा निकाल गुरुवारी (ता. २३) लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष वाघेरे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष चिंचवडे यांचे दावे
पिंपरी - महाराष्ट्रात मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची ठरली आहे. मतदानोत्तर कौल अंदाजामध्येही शिवसेनेचे श्रीरंग बारणे जिंकणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार?, याविषयी ठोस माहिती मिळू शकली नाही. शिवसेना विजयाची हॅट्‌ट्रिक साधणार की शरद पवार यांची तिसरी पिढी लोकसभेत पोचणार, याचा निकाल गुरुवारी (ता. २३) लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ कार्यालयात सोमवारी (ता. २०) शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. दोघांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा असल्याने त्यांनी निवडणूक जवळून पाहिलेली आहे. त्यांना विविध मुद्द्यांवर बोलते केले. दोघांनीही आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचे सांगताना सव्वा ते दीड लाखाचे मताधिक्‍य असेल, असा दावाही केला.

थेट प्रचाराचा होणार फायदा
वाघेरे म्हणाले, ‘‘मागील निवडणुकीत चिंचवडमधून बारणे यांना मिळालेले मताधिक्‍य या वेळी कमी होईल. पिंपरी मतदारसंघात पार्थ पवार यांना चांगली मते मिळतील. मावळमधील सर्व गटतट एकत्र आल्याने आम्हाला मिळणारी मते ही समान राहतील. पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूर या पट्ट्यातून पार्थ यांना चांगली मते मिळतील आणि सुमारे एक ते दीड लाखांच्या मताधिक्‍याने ते विजयी होतील. पाच वर्षांमध्ये विकासकामे झालेलीच नाहीत, हा मुद्दादेखील मतदारांना पटलेला आहे. नवमतदारांचा कल पार्थ यांच्याकडे होता. राष्ट्रवादीने मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर सर्वाधिक भर दिला, त्यामुळे निवडणुकीत मिळणारा विजय चांगला राहणार आहे.’’

पिंपरी, चिंचवड, पनवेलच्या बळावर जिंकू
चिंचवडे म्हणाले, ‘‘मावळ मतदारसंघाच्या आधीच्या टप्प्यात आठवडाभर आधीच मतदान झाले होते. तिथे मतदानाचा टक्का घसरला होता. तशी परिस्थिती इथे निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही टक्‍केवारी वाढविण्यावर शेवटच्या आठ दिवसांत लक्ष केंद्रित केले होते. त्याचा फायदा आम्हाला निश्‍चित होईल. पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांत अनुक्रमे ८० हजार व २० हजारांचे मताधिक्‍य मिळेल. याखेरीज पनवेलमधूनही चांगली मते पारड्यात पडतील. 

युतीने प्रचारासाठी कार्यकर्त्यांची चांगली बांधणी केली होती. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. शहरातील रावेत, चिंचवडगाव, काळेवाडी, वाकड, पिंपळे निलख या भागांत पक्षाचे कार्यकर्ते चांगले राबले. बूथ पातळीवरचे त्यांचे कामही वाखाणण्याजोगे होते.

निवडणुकीत मतदार स्वतःहून मतदानासाठी बाहेर पडत होते. त्यात तरुणांची संख्या जास्त होती. बारणे यांचा जनसंपर्क, टीम वर्क, पाच वर्षांत केलेले काम, प्रभावी प्रचार, शिवसेना आणि भाजप नेत्यांनी दिलेले पाठबळ, युतीचे आमदार आणि भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेला प्रचार, यामुळे बारणे यांना या निवडणुकीत मिळणारा विजय चांगलाच असेल. पिंपरी, चिंचवड याबरोबर मावळ, उरण, पनवेल या भागांतून मिळणारा मताधिक्‍याचा आकडा मोठा राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Result Maval Constituency NCP Shivsena Politics