Loksabha 2019 : मतमोजणीसाठी प्रशासनाकडून ‘मॉक ड्रिल’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

मतमोजणी केंद्रावर 

  • प्रत्येक टेबलकरिता उमेदवारांचे प्रतिनिधी असतील
  • उमेदवारांच्या प्रतिनिधींना मोबाईल, लॅपटॉप, कॅलक्‍युलेटर आणण्यावर बंदी
  • भोजन आणि अल्पोपाहाराची स्वतंत्र व्यवस्था
  • ओळखपत्र असलेल्या उमेदवार प्रतिनिधींनाच मतमोजणी केंद्राच्या आवारात प्रवेश

पुणे - जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीच्या दिवशी तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रांवर मंगळवारी ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आले.

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात, तर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. या दोन्ही ठिकाणी जिल्हा निवडणूक प्रशासनाने सर्व आवश्‍यक तयारी केली आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी साडेचार ते पाच हजार कर्मचारी कार्यरत राहतील. यासोबतच शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. ‘मॉक ड्रिल’मध्ये मतमोजणीची फेरी पूर्ण झाल्यानंतर ‘सुविधा’ पोर्टलवर आकडेवारी अपडेट कशी करावी, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, बुधवारी (ता. २२) मतमोजणी केंद्रांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा मतमोजणीबाबत प्रशिक्षण देणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली.

व्हीव्हीपॅटद्वारे अशी होणार मतमोजणी
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच-पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिन लॉटद्वारे निवडण्यात येतील. या व्हीव्हीपॅट मशिनमधील सर्व चिठ्ठ्यांची मतमोजणी करण्यात येणार आहे. या मशिनमध्ये जेवढ्या चिठ्ठ्या असतील, त्यांचे उमेदवारनिहाय २५-२५ चे गठ्ठे बांधण्यात येतील. उर्वरित २५ पेक्षा कमी असलेल्या चिठ्ठ्यांचा एक गठ्ठा बांधण्यात येईल. मतमोजणी प्रक्रिया सोपी व्हावी, असा त्यामागील उद्देश आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली.  

व्होटर हेल्पलाइन ॲपवर माहिती 
मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांकडून शासकीय ‘सुविधा’ पोर्टलवर फेरीनिहाय आकडेवारी अपडेट करण्यात येणार आहे. या पोर्टलवर प्रत्येक फेरीतील मतांची आकडेवारी भरल्यानंतर ती व्होटर हेल्पलाइन ॲपवर लगेच दिसणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Result Vote Counting Administrative Mock Drill