Loksabha 2019 : पुणे जिल्ह्यात ८५ उमेदवारांची अनामत जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

अशी होते अनामत जप्त
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवाराला एकूण मतदानाच्या १/६ (१६.६६ टक्‍के) मते न मिळाल्यास त्या उमेदवाराची अनामत रक्‍कम जप्त होते. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना सर्वसाधारण उमेदवाराला २५ हजार रुपये तर, अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवाराला १२ हजार पाचशे रुपये अनामत रक्‍कम जमा करावी लागते.

पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.  

पुणे लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. भाजपचे गिरीश बापट यांना सहा लाख ३२ हजार ८३५ मते म्हणजेच एकूण मतदानाच्या ६१.१३ टक्‍के मते मिळाली. काँग्रेसचे मोहन जोशी यांना तीन लाख आठ हजार २०७ (२९. ७७ टक्‍के) मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव यांना ६४ हजार ७९३ (६.२६ टक्‍के) मते मिळाली. पुण्यात बापट आणि जोशी वगळता अन्य २९ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. 

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना सहा लाख ८६ हजार ७१४ (५२.६३ टक्‍के) मिळाली. तर, भाजपच्या कांचन कुल यांना पाच लाख ३० हजार ९४० (४०. ६९ टक्‍के) मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांना ४४ हजार १३४ (३.३८ टक्‍के) मते मिळाली. सुळे आणि कुल वगळता अन्य १६ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. 

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांना सहा लाख ३५ हजार ८३० मते मिळाली. हे प्रमाण ४९.१७ टक्‍के आहे. तर, शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांना पाच लाख ७७ हजार ३४७ (४४.६५ टक्‍के) मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे राहुल ओव्हाळ यांना ३८ हजार ७० (२.९४ टक्‍के) मते मिळाली. कोल्हे आणि आढळराव यांच्या व्यतिरिक्‍त अन्य २१ जणांना अनामत रक्‍कम वाचवता आली नाही.

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना सात लाख २० हजार ६६३ (५२.६५ टक्‍के) मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांना पाच लाख ४ हजार ७५० (३६.८७ टक्‍के) मते मिळाली आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना ७५ हजार ९०४ (५.५५ टक्‍के) मते मिळाली आहेत. बारणे आणि पवार वगळता अन्य १९ जणांची अनामत रक्‍कम जप्त झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Results 85 Candidate Deposit Seized