Loksabha 2019 : आढळराव यांचा मंत्रिपदासाठी ‘क्लेम’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

‘केंद्रात पुन्हा येऊ घातलेल्या मोदी सरकारमध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मंत्रिपदासाठी ‘क्लेम’ आहे,’’ अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

शिक्रापूर - ‘केंद्रात पुन्हा येऊ घातलेल्या मोदी सरकारमध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मंत्रिपदासाठी ‘क्लेम’ आहे,’’ अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

पाबळ (ता. शिरूर) येथे रविवारी (ता. १४) आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी शिवतारे बोलत होते. या वेळी आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख राम गावडे आदी उपस्थिती होते. 

या वेळी शिवतारे यांनी देशातील सद्यःस्थितीचा आढावा घेत पूर्वीच्या आणि मोदी सरकारच्या कामाचा तुलनात्मक आढावा घेतला. तसेच, लोणी- धामणी येथील म्हाळसाकांत योजनेच्या नावाने गेली अनेक वर्षे आंबेगावकरांना कसे फसविले गेले, ते सांगितले. 

या सभेच्या सुरवातीला केंदूरचे माजी उपसरपंच युवराज साकोरे व रवींद्र गायकवाड यांनी कळमोडी- थिटेवाडी बंद पाइपलाइन योजनेसाठी पाबळ- केंदूर व परिसरातील बारा गावांनी केलेल्या आंदोलनांची माहिती दिली व या योजनेमुळे या वेळी आढळराव पाटील यांना प्रत्येक गावात दोन हजारांचे मताधिक्‍य देणार असल्याचे सांगितले. आढळराव पाटील म्हणाले, ‘‘हल्लाबोल आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात कांद्याला कधी नीट भाव मिळाले होते का? मात्र, आमच्या काळात कांद्याच्या भावाचा प्रश्न उपस्थित होताच मी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर एकट्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल १० कोटी एवढे अनुदान मिळाले.

Web Title: Loksabha Election 2019 Shivajirao Adhalrao Minister Politics