Loksabha 2019 : श्रीरंग बारणे सर्वांत श्रीमंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक श्रीमंत उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे ठरले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांचा क्रमांक लागतो. या दोघांमधील संपत्तीत ७४ कोटी २० लाख रुपयांचा फरक आहे. तसेच उत्पन्न स्रोत, ठेवी, गुंतवणूक, वाहने, मौल्यवान वस्तू यामध्येही बारणे पुढे आहेत.

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक श्रीमंत उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे ठरले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांचा क्रमांक लागतो. या दोघांमधील संपत्तीत ७४ कोटी २० लाख रुपयांचा फरक आहे. तसेच उत्पन्न स्रोत, ठेवी, गुंतवणूक, वाहने, मौल्यवान वस्तू यामध्येही बारणे पुढे आहेत. निवडणूक रिंगणातील अन्य २७ उमेदवारांच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत बारणे यांची संपत्ती दहा पटीहून अधिक आहे.

श्रीरंग बारणे यांचे वार्षिक उत्पन्न ४५ लाख रुपये आहे. त्यांची एकूण जंगम मालमत्ता १३ कोटी ७७ लाखांची, तर स्थावर मालमत्ता ६१ कोटी ६२ लाखांची आहे. १० कोटींचे कर्ज आहे. विविध मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाबाबत त्यांच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत. पार्थ यांच्यावर मात्र एकही गुन्हा दाखल नाही. पार्थ यांचे गेल्या आर्थिक वर्षातील उत्पन्न २० लाख आहे. एकूण जंगम मालमत्ता तीन कोटी ७० लाखांची व स्थावर मालमत्ता १६ कोटी ४३ लाखांची आहे. नऊ कोटी ३६ लाखांची त्यांच्यावर देणी आहेत.

मावळसाठी एकूण ३२ जणांनी ४५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात पार्थ व बारणे यांचे प्रत्येकी चार अर्ज आहेत. बुधवारी झालेल्या छाननीत चार जणांचे अर्ज बाद झाले, त्यामुळे २८ जणांचे अर्ज राहिले आहेत. उमेदवारांच्या संपत्तीच्या विवरणात पार्थ व बारणे वगळून अन्य उमेदवारांची जंगम मालमत्ता एक कोटी ६० लाखांची, तर स्थावर मालमत्ता आठ कोटी ३५ लाखांची आहे. ६० लाखांच्या त्यांच्या ठेवी आहेत. सर्व मिळून ९१ लाख रुपयांचे कर्ज व २३ वाहने आहेत. त्यांच्यात खारघर (नवी मुंबई) येथील नवनाथ दुधाळ श्रीमंत आहेत. ते सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या पत्नीचा व्यवसाय आहे. दोघांची मिळून ६९ लाखांची मालमत्ता आहे. त्यामध्ये वाहने, सोने, रोख, शेअर्स, ठेवी, गुंतवणूक, बॅंक बॅलन्स यांचा समावेश आहे. त्यांची १३ एकर जमीन असून, तिची किंमत सव्वा कोटी रुपये आहे. या खालोखाल नवी मुंबईचेच राजाराम पाटील यांचा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती ५४ लाखांची आहे. केगाव (ता. उरण) येथे त्यांची जमीन आहे.

असे आहेत उमेदवार
मावळ मतदारसंघात ३२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील २० जण अपक्ष आहेत. राष्ट्रवादी, शिवसेनेसह हिंदुस्थान जनता पक्ष, बळिराजा पार्टी, भारतीय प्रजा सुराज्य पक्ष, बहुजन रिपब्लिक प्रजा सुराज्य पक्ष, क्रांतिकारी जयहिंद सेना, भारतीय नवजवान सेना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, बहुजन मुक्ती पक्ष, आंबेडकर राइट्‌स पार्टी ऑफ इंडिया यांच्या उमेदवारांचा समावेश आहे. 

घाटाखालचे ११ उमेदवार
पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ आणि रायगडमधील उरण, पनवेल व कर्जत विधानसभा क्षेत्र मिळून मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे घाटाखालील तीन व घाटावरील तीन विधानसभा क्षेत्र, असे संबोधले जाते. उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये घाटाखालील ११ जणांचा व घाटावरील १६ जणांचा समावेश आहे. 

बाहेरील पाच उमेदवार
मावळ मतदारसंघाबाहेरील पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात पार्थ पवार बारामतीचे आहेत. अन्य चौघेजण खडकवासला, वाशीम, इंदापूर व खडकी येथील आहेत. दोघांनी आयकर विवरण भरलेले नाही. तसेच, बारणे यांच्यासह चौघांवर गुन्हे दाखल आहेत. यात आंदोलन करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, अशा कारणांचा समावेश आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Shrirang Barne Rich Politics