Loksabha 2019 : मतदानाच्या दिवशी १२०० बस धावणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

पीएमपीला मिळणार सव्वा कोटी 
पीएमपीच्या ताफ्यातील एकूण ७२२ बस जिल्हा निवडणूक आयोग ताब्यात घेणार आहे. त्यामुळे प्रति बस पीएमपीने किमान ८ हजार रुपये रोज मिळावेत, अशी मागणी केली आहे. त्यानुसार पैसे देण्याची तयारी निवडणूक आयोगाने दर्शविली आहे. त्यामुळे पीएमपीच्या तिजोरीत किमान सव्वा कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

पीएमपीच्या ३६१ बस निवडणुकीसाठी; दोन दिवस प्रवाशांची गैरसोय
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आणि त्या पूर्वी एक दिवस, पीएमपीच्या ३६१ बस जिल्हा निवडणूक आयोगाला द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील प्रवाशांसाठी ते दोन दिवस फक्त १२०० बस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्यांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्‍यता आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी मतदानाच्या तयारीसाठी एक दिवस अगोदर पीएमपीला ३६१ बस प्रशासनाला उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. 

मतदानाच्या दिवशीही  मतदान कर्मचाऱ्यांची आणि साहित्याची वाहतूक करण्यासाठी ३६१ बस लागणार असल्याचे जिल्हा निवडणूक आयोगाने पीएमपीला कळविले आहे. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने तयारी केली आहे. पीएमपीकडे सध्या सुमारे २ हजार बस आहेत. त्यातील १५५० बस सुमारे ३४० मार्गांवर धावतात. त्यातून दररोज ११ लाख प्रवाशांची वाहतूक होते.

पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ४५० बस नादुरुस्त आहेत. त्यातील अनेक बसचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे या बस दुरुस्त करून मार्गावर आणण्यावर मर्यादा आहेत. तरीही मतदानादरम्यान दोन दिवस लागणाऱ्या जादा बसची आवश्‍यकता लक्षात घेऊन जास्तीत बस उपलब्ध करून देण्यात येतील, असे पीएमपीच्या वाहतूक विभागाने प्रशासनाला कळविले आहे.

निवडणुकीच्या कामांसाठी बस द्याव्या लागणार असल्या, तरी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याकडे प्रशासनाचे लक्ष आहे. मतदानादरम्यानच्या दोन्ही दिवशी बंद बसपैकी जास्तीत जास्त बस मार्गावर आणणार असून, त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 
- नयना गुंडे,  अध्यक्षा, पीएमपी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Voting BUS