Loksabha 2019 : कमी मतदान झालेल्या केंद्रांवर भाजपचे लक्ष

ब्रिजमोहन पाटील
बुधवार, 17 एप्रिल 2019

गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारच्या योजनांचे सर्वांत जास्त लाभार्थी या तीन मतदारसंघांत आहेत. पक्षाचे संघटनही या भागात मजबूत केले असल्याने आम्हाला गेल्या वेळीपेक्षा जास्त मताधिक्‍य येथे मिळेल.
- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप

४५५ मतदान केंद्रांवर वॉर रूम आणि प्रत्यक्ष संपर्कातून भर
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची ‘वॉर रूम’ अधिक सक्रिय झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला कॅंटोन्मेंट, वडगाव शेरी व शिवाजीनगर मतदारसंघात ज्या ठिकाणी ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतदान झाले आहे, अशा ४५५ मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. विरोधी पक्षांना मताधिक्‍य मिळू नये, यासाठी शर्थीने प्रयत्न केले जात आहेत. 

लोकसभा निवडणुकीत प्रचाराला दिवस कमी आणि मतदारांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक भागातील मतदारांपर्यंत पोचण्याचे आव्हान उमेदवारांपुढे असते. भाजपने प्रचारात आघाडी घेतली असून, बहुतांश प्रभागात प्रचारफेऱ्या झालेल्या आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या वॉर रूममधून पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघात मतदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानानुसार कसबा, पर्वती, वडगाव शेरी, शिवाजीनगर, पुणे कॅंटोन्मेंट आणि कोथरूड या मतदारसंघात मतदान केंद्रनिहाय वर्गवारी करण्यात आली आहे. भाजपला ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झालेले केंद्र, ५० ते ५९ टक्के, ४० ते ५० टक्के, २० ते ३० टक्के आणि १९ टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतदान झालेले केंद्र याचे विश्‍लेषण केले आहे. भाजपला पुणे कॅंटोन्मेंट, शिवाजीनगरचा काही भाग व वडगाव शेरी येथील भागात ४० ते ५९ टक्के मतदान झालेल्या केंद्रांची संख्या ४५५ एवढी मोठी आहे; तर याच भागात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला जास्त मते मिळाली आहेत. हे तिन्ही पक्ष आता लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आहेत. त्याचा फटका या भागाला बसू नये यासाठीची व्यूहरचना आखण्यात आली आहे. याभागात विविध संघटना, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी बैठका, गाठीभेटी घेतल्या जात आहेत. 

मताधिक्‍य राखण्यासाठी प्रयत्न 
भाजपला पुणे लोकसभा मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत तीन लाख १५ हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. त्यात शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि कॅंटोन्मेंटमधून ९५ हजारांचे मताधिक्‍य होते. २०१९ च्या निवडणुकीमध्ये पूर्वीसारखी लाट नाही, त्यामुळे रोजच्या प्रचाराचा आढावा घेत असून, मताधिक्‍य राखण्यासाठी प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Loksabha Election 2019 Voting center BJP Watch Politics