Loksabha 2019 : मतदानासाठी आलेल्या आजोबांचे डोळे पाणावले! (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

कर्मचाऱ्यांचे आभार
वयाची नव्वदी पार केलेल्या आपल्या आईसमवेत सेनापती बापट रस्त्याजवळील भारतीय विद्या भवन शाळेतील मतदान केंद्रावर सुहास कोलंगडे सकाळी साडेनऊच्या सुमारास आले. सुहास यांचेही वय सत्तरीच्या आसपास. या दोघांना पाहून केंद्रावरील कर्मचारी पुढे आले. सुहास यांच्या आई विजयालक्ष्मी कोलंगडे यांच्यासाठी व्हीलचेअर आणून दिली. त्यांना मतदान कक्षापर्यंत सोडले आणि मतदान झाल्यावर केंद्राबाहेर नेण्यासही मदत केली. याबद्दल सुहास यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

पुणे - पाय अधू असल्याने एकट्याने चालणे अवघड होते, तरीही मतदान केंद्रावर आलो. मला पाहताच अत्यंत तत्परतेने केंद्रातील कर्मचारी धावून आले.

खुर्ची देऊ का? व्हीलचेअर देऊ का? अशी विचारणा त्यांनी केली. एक कर्मचारी मतदान होईपर्यंत अर्धा तास माझ्यासमवेत होता. इतक्‍या चांगल्या पद्धतीची वागणूक यापूर्वी कधीच न मिळाल्याने भारावून गेलो, असा अनुभव सांगत शिवाजी देशमुख या आजोबांचे डोळे पाणावले.

औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूलमध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या. ७७ वर्षीय जयश्री देशमुख या औंध परिसरातील रहिवासी. चालता येत नसल्याने वॉकर घेऊन त्या मतदान केंद्रावर आल्या. त्या म्हणाल्या, ‘‘एक पाय दुखत असल्याने चालता येत नाही. परंतु, केंद्रावर आल्यानंतर व्हीलचेअर आणून देण्यासंदर्भात विचारणा केली. एका कर्मचाऱ्याने हाताला धरून बूथच्या दारापर्यंत नेऊन सोडले. मतदान झाल्यानंतर पुन्हा बाहेर गाडीपर्यंत येण्यास मदत केली.’’

यंदा मतदानासाठी मध्यमवर्ग आणि तरुण मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत, असे समाधान ८६ वर्षांच्या वसंत कुलगोड यांनी व्यक्त केले. वयाची बहात्तरी पार केलेले केशव माळी म्हणतात, ‘‘मी आतापर्यंत खूप वेळा मतदान केले. परंतु, मतदानासाठीचा एवढा उत्साह कधीही पाहिला नाही. मतदान केंद्रावरील बूथची संख्या वाढविली असती, तर रांगा लागल्या नसत्या.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Voting Grandfather