Loksabha 2019 : मतदान २९ एप्रिलला, सुटी मात्र २३ ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आम्हाला मंगळवारी (ता. २३) सुटी देण्यात आली आहे. मावळ मतदारसंघातील मतदान २९ रोजी आहे. त्या दिवशी सुटी नाही. त्यामुळे सकाळी मतदान करून ऑफिसला जाणार आहे. 
- केदार तुंगीकर

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र हिंजवडी आयटी पार्कमध्ये कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी (ता. २३) सुटी दिल्याने पिंपरी-चिंचवडमधील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी वेळ काढून मतदान करावे 
लागणार आहे.

पिंपरी-चिंचवडचा परिसर मावळ मतदारसंघाला जोडलेला आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये तीन ते साडेतीन लाख कर्मचारी काम करतात. त्यातील अनेक कर्मचारी वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, चिंचवड, निगडी-प्राधिकरण परिसरात राहतात. पुण्यातील मतदानाच्या दिवशी अनेक आयटी कंपन्यांनी सुटी दिली आहे. त्यामुळे पुणे परिसरात राहणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना मतदान करणे शक्‍य होणार आहे. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांची मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुंबईतील अनेक जणांचा समावेश आहेत. मुंबईत २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या मुंबईतील कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी वेळ मिळणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. 

...असा आहे सुटीचा आदेश
मतदारांना मतदान करता यावे, म्हणून संबंधित लोकसभा मतदारसंघात सार्वजनिक सुटी जाहीर करावी, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे. तेथे सार्वजनिक सुटी जाहीर करणे आवश्‍यक असल्याचे त्यात नमूद केले आहे. हिंजवडी असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल चरणजितसिंह भोगल  (निवृत्त) म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीच्या दिवशी देण्यात येणाऱ्या सुटीसंदर्भात निवडणूक आयोगाकडून जो आदेश दिला आहे. त्याची माहिती आयटी कंपन्यांना दिली आहे. कंपन्यांनी त्यानुसार निर्णय घेऊन अंमलबजावणी करायला हवी.’’

याबाबत पी. मंगेश म्हणाले, ‘‘पुण्यात होणाऱ्या मतदानाच्या दिवशी आयटी कंपन्यांनी सुटी जाहीर केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्या दिवशी कामावरील वेळ काढून मतदानाचा हक्क बजवावा लागेल.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Voting IT Company Holiday Maval Constituency