Loksabha 2019 : मतदानाचा टक्का वाढविणार - योगेश गोगावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

भाजपने लोकसभा निवडणुकीचा घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. आता शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष मतदानासाठी तयारी सुरू आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.

पुणे - भाजपने लोकसभा निवडणुकीचा घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. आता शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष मतदानासाठी तयारी सुरू आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी प्रत्येक प्रभागानुसार नियोजन केले. त्यानुसार कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, व्यापारी यांचे मेळावे घेतले आहेत. बापट यांच्या मतदारसंघनिहाय प्रचार फेऱ्या झाल्या असून, अनेक प्रभागांतील नागरिकांशी संवाद साधून प्रचाराचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंदननगर व नाना पेठ येथे दोन सभा झाल्या. शहरात दोनशे कोपरा सभा घेण्याचे नियोजन आहे. केंद्र सरकारने केलेले काम नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी एलईडी प्रचाररथ शहरात फिरत असून, पथनाट्यही सादर केली जात असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘प्रचारासाठी शेवटचा आठवडा शिल्लक असून, उमेदवारांचे परिचयपत्रक घरोघरी वाटप करण्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. पुण्यात नितीन गडकरी, विनय सहस्रबुद्धे, पंकजा मुंडे यांसह अन्य काही नेत्यांच्या सभाही होणार आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर पोलिंग एजंटची नेमणूकही करण्यात आली आहे.’’

पुणेकरांना पुढील पाच वर्षांत काय देणार याचा जाहीरनामा तयार केला आहे. १७ एप्रिल रोजी तो जाहीर केला जाणार आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदान कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.
- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Voting Percentage Yogesh Gogawale