Loksabha 2019 :  एकनिष्ठ शिवसैनिक प्रचारापासून अलिप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेणे, त्यांना बळ न देणे, पक्षसंघटन न करणे, यामुळे शिवसेनेतील बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारापासून अद्याप ते अलिप्त आहेत.

पिंपरी -  कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेणे, त्यांना बळ न देणे, पक्षसंघटन न करणे, यामुळे शिवसेनेतील बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारापासून अद्याप ते अलिप्त आहेत. हे बारणे यांना अडचणीचे ठरू शकते, अशी राजकीय जाणकारांमध्ये चर्चा आहे.

मावळ मतदारसंघातील मतदान सोमवारी (ता. २९) आहे. निवडणूक आचारसंहितेनुसार मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर उमेदवारांना प्रचार संपवावा लागतो. याचा विचार केल्यास महायुतीचे उमेदवार बारणे यांच्याकडे केवळ सहा दिवस  प्रचारासाठी उरले आहेत. मात्र, पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा क्षेत्रातील कट्टर शिवसैनिक प्रचारापासून लांब आहेत. यात आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच, मित्र पक्ष भारतीय जनता पक्षातील बहुतांश नाराज मंडळीही बारणे यांच्यापासून ‘चार हात दूर’ अंतर ठेवून आहेत. याचा फटका थेट बारणे यांना बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

माजी जिल्हाप्रमुख दूर
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बारणे यांच्या प्रचारापासून दूर आहेत. त्याचा फटका मावळात बसू शकतो. पिंपरी-चिंचवडच्या नाराज माजी महिला शहरप्रमुख सध्या परदेशात आहेत. काही नाराज पदाधिकारी व कट्टर शिवसैनिकही प्रचारात दिसेनासे झाले आहेत. कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेणे, त्यांना बळ न देणे, पक्षसंघटन न करणे, यामुळे शिवसैनिक नाराज असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

शहर शिवसेनेमध्ये सध्या दोन गट पडले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून त्यांनाच दैवत मानणारे बहुतांश कार्यकर्ते अद्यापही शहरात आहेत. त्यांची कट्टरता सर्वांनाचा ठाऊक आहे. मात्र, बारणे हे काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आलेले मूळचे काँग्रेसचे कार्यकर्तेच सध्या बारणे यांच्याभोवती दिसत आहेत. प्रचाराची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. यामुळे शिवसेनेतील कार्यकर्ते नाराज आहेत. 

पदाधिकाऱ्यांकडून नन्नाचा पाढा
‘नमस्कार, अहो अप्पांच्या प्रचाराचे आजचे नियोजन काय? जरा सांगता का?’, ‘काहो, कशासाठी?’, ‘बातमीसाठी...’ ‘मी आता... येथे आहे. फारसं सांगता येणार नाही. तुम्हाला...चा नंबर देतो, त्यांच्याशी बोला.’ संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. फोन करण्याचे कारण सांगितले. पलीकडून उत्तर मिळाले, ‘मला फारसं माहीत नाही. तुम्ही... शी संपर्क साधा.’ ‘अहो पण, ... यांनी तर तुमचं नाव सांगितलं. तुमच्याकडून माहिती मिळेल म्हणाले.’ ‘ते बरोबर आहे. पण, मला फारसं सांगता येणार नाही,’ ही स्थिती आहे, बारणे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या जबाबदार पदाधिकाऱ्यांची. त्यांच्याशी केव्हाही संपर्क साधला, तरी ‘मला माहीत नाही,’ असेच उत्तर मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loyal Shivsainik detached from the campaign in Maval Lok Sabha Constituency