Loksabha 2019 : पिंपरीत सर्वाधिक आचारसंहितेचा भंग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

लोकसभा निवडणुकीदरम्यान शहरात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, शक्तिप्रदर्शने करण्यात आली, त्याचबरोबर आचारसंहितेच्या घटनाही अपवाद नव्हत्या. येथील मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या दाखल झालेल्या 214 तक्रारींपैकी सर्वाधिक 90 तक्रारी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आल्या आहेत.

पिंपरी - लोकसभा निवडणुकीदरम्यान शहरात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, शक्तिप्रदर्शने करण्यात आली, त्याचबरोबर आचारसंहितेच्या घटनाही अपवाद नव्हत्या. येथील मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या दाखल झालेल्या 214 तक्रारींपैकी सर्वाधिक 90 तक्रारी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आल्या आहेत. त्याखालोखाल 83 तक्रारी चिंचवड मतदारसंघातून, तर भोसरीतून 41 तक्रारींची नोंद झाली आहे. 

निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंगाचे प्रकार होत असतात. मात्र, अनेक जण नावामुळे तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. या वेळी निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाची तक्रार देण्यासाठी "सीव्हीजील' ऍपची सुविधा उपलब्ध करून दिली होती, त्यामुळे शहरातून आलेल्या तक्रारींपैकी बऱ्याचशा तक्रारी या ऍपवरच आल्या होत्या. मावळ मतदारसंघातील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींत वाढ झाली होती. 

आचारसंहिता भंगाबाबत आलेल्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने उमेदवारांचे बॅनर लावताना निवडणूक विभागाची परवानगी न घेणे, सभेसाठी परवानगी न घेता मंडप टाकणे, कोपरा सभा, प्रचार सभा, प्रचारासाठी वाहन परवाना घेण्याबाबतच्या तक्रारींची संख्या अधिक होती. दरम्यान, निवडणुकी दरम्यान आलेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारींची दखल घेण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात होणाऱ्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने 28 तपासणी नाके आणि 88 पथकांची नियुक्ती केली आहे. 

मावळ तालुक्‍यातून 40 तक्रारी 
मावळ विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या चाळीस तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यात राजकीय फलक न झाकणे, प्रचारासाठी परवानगी न घेणे अशा प्रकारच्या तक्रारी होत्या. निवडणुकीच्या अगोदर झालेल्या पावसादरम्यान मावळ परिसरात अनेक ठिकाणी झालेले राजकीय फलक पुन्हा खुले झाले होते, त्यामुळे काही नागरिकांनी त्या संदर्भात तक्रार नोंदविली होती. निवडणूक आयोगाने या संदर्भात तत्काळ पावले उचलून हे फलक झाकले होते. भोसरीमध्ये आलेल्या तक्रारींमध्ये अशाच प्रकारांचा समावेश राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

प्रत्येक तक्रारीची दखल 
आचारसंहिता भंग झाल्याबाबत निवडणूक आयोगाकडे आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी या तक्रारींची शहानिशा करून त्याबाबत निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most violation of code of conduct in Pimpri city