Election Results : पार्थच्या रुपाने पवार कुटंबियांचा पहिला राजकीय पराभव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 May 2019

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे पवार यांच्यापेक्षा एक लाख 71 हजार मतांनी आघाडीवर आहेत

पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे पवार यांच्यापेक्षा एक लाख 71 हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

अजित पवार यांचा मुलगा पार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे, हा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारसंघात तळ ठोकला होता. त्या उलट भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचा प्रचार करणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. 

बारणे हे विद्यमान खासदार असून, त्यांनी गेले सात-आठ महिने मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने बांधणी केली होती. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी स्वतः लक्ष घातले होते. 
पिंपरी चिंचवड महापालिका हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात होता. त्याच्या हातातून भाजपने महापालिकेतील सत्ता हिसकावून घेतली. पनवेल महापालिकाही भाजपने ताब्यात घेतली. पुणे जिल्ह्यात पवार यांचा पराभव केल्यास, राष्ट्रवादी कॉंग्रेसला विशेषतः अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसणार आहे. ते लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या भागात लक्ष घातले होते. 

बारणे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत बारणे यांना पाच लाख 58 हजार 96 मते मिळाली असून, पवार यांना तीन लाख 86 हजार 523 मते मिळाली आहेत. दहा लाख 54 हजार मते मोजून झाली आहेत. मतदारसंघात एकूण तेरा लाख 66 हजार मतदान झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP candidate Parth Pawar may be defeted in Maval Loksabha constituency