Loksabha 2019 : राहुल गांधींच्या अर्जावर आक्षेप म्हणजे पराभूत भाजपचे काळे कारनामे : पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी लोकसभा मतदार संघात भरलेल्या उमेदवारी अर्जावर तेथील एका अपक्ष उमेदवाराने आक्षेप नोंदवून राहुल गांधीच्या नागरिकतत्वा बद्दल आक्षेप नोंदवला आहे.

 पुणे :  कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी लोकसभा मतदार संघात भरलेल्या उमेदवारी अर्जावर तेथील एका अपक्ष उमेदवाराने आक्षेप नोंदवून राहुल गांधीच्या नागरिकतत्वा बद्दल आक्षेप नोंदवला आहे. भाजपच्या भोपाळ मधील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे देशभर संतापाची लाट उमटली आहे. त्यापासून लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठीच  भाजपने अमेठीतील अपक्ष उमेदवाराला हाताशी धरून आक्षेप नोंदवून सणसणाटी करण्याच्या प्रयत्न केला आहे. यावर निवडणूक आयोग दिनांक २२ रोजी निर्णय देणार आहे.

वास्तविक असे खोटे आरोप यापूर्वीही झाले होते व ते हवेत विरूनही गेले होते. राहुल गांधी हे लोकसभेत खासदार म्हणून तेव्हाही आणि आत्ताही निवडून आले आहेत. शिवाय केरळ मधील वायनाड लोकसभा मतदार संघातूनही राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढवत आहेत. तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या अर्जाची छाननी करून तो मंजूर केला आहे. अमेठीत मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अमेठीतील निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव येत असल्याच दिसून येत आहे. स्वतःच्या शिक्षणाची खोटी माहिती देणाऱ्या स्मृती इराणी यांना प्रत्येक वेळी दिल्ली आणि अमेठी मधील मतदारांनी झिडकारले आहे.

तरीही देखील अमेठीतून त्या पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्याचा मार्ग मोकळा होण्यासाठी भाजप ने हे कारस्थान रचल्याची चर्चा केवळ अमेठीतच नव्हे तर देशात आहे. मात्र केरळ मधील वायणाड आणि अमेठीतील निवडणूक अधिकारी एकाच पद्धतीने कायद्याच्या चौकटीत  काम करत असतानाही अमेठीतील निवडणूक अधिकाऱ्यांवर चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाजपने दबाव आणला आहे काय याचीही आता चौकशी व्हायला हवी. राहुल गांधी हे अमेठी आणि वायनाड या दोन्ही लोकसभा मतदार संघातून निश्चित निवडून येतील आणि भाजपचे काळे कारनामे तेथील जनता उधळून लावेल हा सर्वांना विश्वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Objection to Rahul Gandhis application in Amethi Lok Sabha constituency