Loksabha 2019: ईव्हीएम गैरव्यवहार उघड झाल्यास लोकशाही धोक्‍यात: पवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 May 2019

शरद पवार म्हणाले की, काही जणांनी ईव्हीएममधील चीपमध्ये छेडछाड होऊ शकते, अशी माहिती आपल्याला दिली. गुजरात, मध्य प्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडल्याचे माझ्या वाचनात आले; मात्र माझ्याकडे याबाबत खात्रीलायक माहिती नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे अन्य नेते छातीठोकपणे बारामतीसह माढा मतदारसंघातील निवडणुकीत आम्हीच जिंकणार, असे म्हणत होते.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम अर्थात, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात तांत्रिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यास देशाची लोकशाही धोक्‍यात येईल आणि जनता रस्त्यावर उतरेल, अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केली. 

शरद पवार म्हणाले की, काही जणांनी ईव्हीएममधील चीपमध्ये छेडछाड होऊ शकते, अशी माहिती आपल्याला दिली. गुजरात, मध्य प्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडल्याचे माझ्या वाचनात आले; मात्र माझ्याकडे याबाबत खात्रीलायक माहिती नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे अन्य नेते छातीठोकपणे बारामतीसह माढा मतदारसंघातील निवडणुकीत आम्हीच जिंकणार, असे म्हणत होते.

याकडे लक्ष वेधताना पवार म्हणाले की, ज्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही, तेही बारामतीची जागा जिंकणार असल्याचे धाडसाने सांगतात. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नियोजन केले आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात आहे. दुर्दैवाने निवडणूक आयोगाबद्दल सध्या येणाऱ्या बातम्या चांगल्या नाहीत. त्यामुळे असे काही घडले, तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्‍वास उडेल, अशी भीती व्यक्त करत पवार यांनी निवडणूक यंत्रणेवर लोकांचा विश्‍वास कायम राहायला हवा, असे मत व्यक्त केले. 

बारामतीमधून शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. सुप्रिया सुळे सलग दोन वेळा खासदार झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने "रासप' आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच, माढा मतदारसंघातही भाजपने विशेष लक्ष दिले असून, बारामतीत चंद्रकांत पाटील निवडणूक संपेपर्यंत तळ ठोकून होते. बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना, अशी शंका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 

शरद पवार यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती या वेळी निवडून येणार नाही. त्यामुळे पवारांनी त्यांच्या पराभवाची कारणे लिहायला सुरुवात केली आहेत. तीन राज्यांत आमचा पराभव झाला, तो आम्ही मान्य केला. शरद पवार यांनीही पराभव झाल्यास मान्य करावा.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

शरद पवार यांना पराभव समोर दिसत आहे. आता अपयशाचे खापर फोडण्यासाठी ते ईव्हीएमकडे बोट दाखवत आहेत. निवडणूक आयोगाने ईव्हीएमबाबत यापूर्वीच सर्व शंका दूर केल्या आहेत. विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅटही वापरले गेले आहेत. बारामती मतदारसंघातून पवारांना मिळालेल्या माहितीनुसार ही जागा आपल्या हातातून जाऊ शकते, असे त्यांना समजले असावे. त्यामुळेच अपयशाचे खापर फोडण्यासाठी त्यांनी ईव्हीएमबाबत बोलायला सुरुवात केली.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People will lose faith on elections if bjp wins baramati says sharad pawar