Loksabha 2019 : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात निष्पक्ष, निर्भय आणि भयमुक्‍त वातावरणात निवडणुका पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत.

पुणे : पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात निष्पक्ष, निर्भय आणि भयमुक्‍त वातावरणात निवडणुका पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत. शहर आणि ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत चार लाख मतदार वाढले असून, मतदानासाठी जनजागृती करण्यात आली आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी वाढेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्‍त केला. 

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. 23) मतदान होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्‍त मितेश घट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी राम म्हणाले, ""कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधा आणि मदत कक्ष असतील. दिव्यांग मतदारांसाठी सुविधा उपलब्ध केल्या असून, महिला अधिकारी व कर्मचारी असलेले "सखी' मतदार केंद्रेही असतील. सुमारे 70 टक्‍के मतदार चिठ्ठ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. पुणे मतदारसंघातील 91 आणि बारामतीतील 62 संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्‍त बंदोबस्त तैनात करणार आहे. जिल्ह्यात मतदार जनजागृतीमुळे सहा महिन्यांत तीन लाख 92 हजार 729 मतदार वाढले आहेत. परंतु, मतदार नोंदणी करताना काही अर्जांमधील त्रुटींमुळे पुणे मतदारसंघात सहा हजार 743 अर्ज आणि बारामती मतदारसंघात सहा हजार 278 अर्ज रद्द ठरविले आहेत.'' 

बोगस मतदान रोखणार 
शहरातून स्थलांतरित झालेल्या, मृत आणि बाहेरगावी गेलेल्या मतदारांच्या नावे बोगस मतदान होण्याची शक्‍यता असते. परंतु, अशा मतदारांची यादी जिल्हा प्रशासनाकडे असून, त्यांच्या नावे मतदान करणाऱ्यांवर निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. 
 
टपाली मतदानासाठी 22 हजार मतपत्रिका 
मागील निवडणुकीत टपाली मतदानासाठी 78 हजार मतपत्रिका पाठविल्या होत्या. परंतु, या वेळी जिल्ह्यात दोन टप्प्यांत मतदान होत आहे. त्यामुळे निवडणूक कर्तव्यावरील आणि अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठी 22 हजार मतपत्रिका पाठविल्या आहेत. तसेच, सैन्यदल आणि राखीव पोलिस दलातील साडेचार हजार सर्व्हिस व्होटर्सना "ईटीपीबीएस' पोर्टलद्वारे ऑनलाइन मतपत्रिका पाठविल्या आहेत. 
 
नादुरुस्त ईव्हीएम 20 मिनिटांत बदलणार 
मतदान केंद्रांवर 20 टक्‍के ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन अतिरिक्‍त आहेत. त्यामध्ये कदाचित तांत्रिक अडचण आल्यास ती 20 मिनिटांत बदलण्यात येतील. ग्रामीण भागात त्याला अर्धा तास लागेल. 

लोकसभा मतदारसंघ एकूण मतदार मतदान केंद्र 
पुणे 20 लाख 74 हजार 861 1997 
बारामती 21 लाख 12 हजार 408 2372 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The percentage of voting will increase in the parliamentary elections