Loksabha 2019 :  पुणे, बारामतीत आजपासून अर्ज भरण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 March 2019

असा आहे पुणे, बारामतीचा निवडणूक कार्यक्रम
  २८ मार्च ते ४ एप्रिल - उमेदवारी अर्ज दाखल करणे
  ५ एप्रिल - उमेदवारी अर्जांची छाननी
  ८ एप्रिलपर्यंत - उमेदवारी अर्ज मागे घेणे
  २३ एप्रिल - प्रत्यक्ष मतदान    २३ मे - मतमोजणी

पुणे -  लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील पुणे, बारामतीसह १४ मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उद्यापासून (ता. २८) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. ४ एप्रिलपर्यंत हे अर्ज दाखल करण्याची मुदत असून, त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे आणि बारामती या दोन मतदारसंघांतील मतदान २३ एप्रिल रोजी होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवारपासून सुरवात होणार आहे.  पुणे मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. भाजपचे उमेदवार म्हणून गिरीश बापट यांची यापूर्वीच घोषणा झाली आहे. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यात सरळ लढत होत आहे.

पुण्यात बापट हे दोन किंवा तीन तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्‍यता आहे. प्रमुख उमेदवारांचे अर्ज २ ते ४ एप्रिलदरम्यान दाखल होण्याची शक्‍यता राजकीय पक्षांकडून वर्तविण्यात येत आहे. ज्या पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत; त्यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या खर्चाचा तपशील नियमित ठेवावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर प्रचारासाठी केवळ चौदाच दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात पोचण्याची उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे.

उमेदवारी अर्जासोबत काय असते?
- संपत्तीचे विवरण
- गुन्ह्यांबाबतचा तपशील
- उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा असल्यास ‘अ’ व ‘ब’ फॉर्म
- अनामत रक्कम (सर्वसाधारण गटासाठी २५ हजार) 

असा आहे पुणे, बारामतीचा निवडणूक कार्यक्रम
  २८ मार्च ते ४ एप्रिल - उमेदवारी अर्ज दाखल करणे
  ५ एप्रिल - उमेदवारी अर्जांची छाननी
  ८ एप्रिलपर्यंत - उमेदवारी अर्ज मागे घेणे
  २३ एप्रिल - प्रत्यक्ष मतदान    २३ मे - मतमोजणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune, Baramati is the third phase of Lok Sabha elections began to fill up an application from today