esakal | कारभारी, आता होऊ द्या जोमानं!... 
sakal

बोलून बातमी शोधा

कारभारी, आता होऊ द्या जोमानं!... 

‘शत-प्रतिशत’ तेही सलग दुसऱ्यांदा. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. ६१.१३ टक्के मतदारांनी भाजपला पसंती दिली.

कारभारी, आता होऊ द्या जोमानं!... 

sakal_logo
By
संभाजी पाटील

‘शत-प्रतिशत’ तेही सलग दुसऱ्यांदा. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. ६१.१३ टक्के मतदारांनी भाजपला पसंती दिली. आतापर्यंत पुणेकरांचा भाजपला मिळालेला हा सर्वांत मोठा कौल आहे. त्यामुळेच आता भाजपची जबाबदारी आहे, ती पुणेकरांच्या विश्‍वासाचा सन्मान करण्याची. पुणेकरांना एक चांगली जीवनशैली मिळावी, त्यांच्या प्रश्‍नांची गतीने सोडवणूक व्हावी, त्यासाठी इथल्या पायाभूत सुविधा वाढवाव्यात, प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षम व्हावी, ही अपेक्षा आहे. 

देशपातळीवरील राजकीय वातावरणाचा कल पाहूनच आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत पुणेकरांनी आपला कौल दिला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना बदल हवा आहे, हे स्पष्टपणे जाणवत होते. यंदाची निवडणूक अशा कोणत्याही लाटेवर स्वार नव्हती. केंद्र सरकारची पाच वर्षांतील कामे, मोदी यांचे नेतृत्व विरुद्ध विरोधी पक्षांनी बांधलेली मोदी यांच्या विरोधातील मोट आणि मोदींच्या कार्यपद्धतीवर घेतलेले आक्षेप याभोवतीच निवडणूक केंद्रित राहिली. त्यात मोदी यांनी बाजी मारली. पुणेकरांनीही सलग दुसऱ्यांदा भाजपला भरभरून साथ दिली. २०१४ च्या मताधिक्‍यात आणखी भर घातली. त्यामुळे आता खरी कसोटी आहे, ती नव्या कारभाऱ्यांची. पुणे महानगराची सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी नवे खासदार गिरीश बापट कसा पुढाकार घेतात, यावर शहराची प्रगती आणि राजकीय स्थितीची वाटचाल अवलंबून राहणार आहे.

ना. ग. गोरे, शंकरराव मोरे, एस. एम. जोशी, मोहन धारिया, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी आदी पुण्याच्या लोकप्रतिनिधींनी देशपातळीवर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. गिरीश बापट यांना राज्यात लोकप्रतिनिधी म्हणून प्रदीर्घ अनुभव आहे. गेल्या साडेचार वर्षांत राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. सातत्याने कार्यकर्त्यांमध्ये वावरणारा, त्यांच्या प्रश्‍नांची जाण असणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख असल्याने आता खासदार म्हणून त्यांच्याकडून पुणेकरांच्या अपेक्षाही साहजिकच जास्त आहेत. पुणे शहर आज स्थित्यंतरातून जात आहे. लोकसंख्या, भौगोलिक विस्तार, औद्योगिक प्रगती अशा बाबतीत महानगराकडे प्रवास असणाऱ्या पुण्यातील पायाभूत सुविधा मात्र नव्या वाटचालीला पुरणाऱ्या नाहीत. नेमके याच ठिकाणी खासदारांना अधिक लक्ष घालावे लागेल. पुणेकरांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपच्या हातात सर्व सूत्रे दिली आहेत, त्यामुळे शहराच्या विकासासाठी कोणतेही अडथळे राहिलेले नाहीत. गरज आहे ती नवनव्या कल्पना राबविण्याची, शासकीय यंत्रणा हलविण्याची, नागरिकांच्या नेमक्‍या गरजा ओळखून त्यांच्याच सहभागातून त्या पूर्ण करणारी यंत्रणा उभारण्याची. 

पुण्यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू होण्याच्या तयारीत आहेत. मेट्रो, स्मार्ट सिटी, रिंगरोड, समान पाणी वापर योजना, नदी सुधारणा, एचसीएमटीआर, पीएमआरडीएचा विकास आराखडा, आंतरराष्ट्रीय विमानतळ असे बहुतेक प्रकल्प हे थेट केंद्र सरकारशी संबंधित आहेत. या प्रत्येक प्रकल्पात बापट यांचा पुढाकार होता. त्यामुळे या प्रकल्पांना गती देण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. आता गरज आहे ती महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधण्याची अन्‌ महापालिकेच्या कारभारावर बारकाईने लक्ष ठेवण्याची. बापट या तीनही पातळीवरील कामांना चांगल्या पद्धतीने गती देऊ शकतात. शहराला आवश्‍यक असणाऱ्या एका चांगल्या नेतृत्वाची उणीव भरून काढण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे ‘कारभारी’ आता होऊ द्या जोमानं...