Loksabha 2019 : शरद पवारांना 'बेटी बचाव'ची गोष्ट मान्य : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय.

पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला.

वडगाव बुद्रूक येथे भाजप शिवसेना महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. केंद्रीयमंत्री रामदास आठवले, खासदार संजय काकडे, अमर साबळे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, महायुतीच्या बारामतीमधील उमेदवार कांचन कुल, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, बाळा भेगडे, जगदीश मुळीक, माधुरी मिसाळ, माजी आमदार शरद ढमाले यावेळी उपस्थित होते.
फडणवीस यांनी, 2022 मधे देशात कुणीच बेघर राहणार नाही, असा दावा करीत पाच वर्षांत मोदी सरकारने केलेल्या विकासकामांची यादी सांगितली.
 
काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करताना ते म्हणाले, "तुम्ही वीस वर्षे पुण्याला विमानतळाचे स्वप्न दाखविले.  पण ते आम्ही पूर्ण करतोय. वीस हजार कोटींचा रिंगरोड देतोय. तुम्ही काहीच केले नाही. पाणी, सिंचनाचे प्यांनागआम्ही सोडवतोय. मेट्रोचे काम सुरू झाले. आता आम्ही पीएमआरडीएच्या क्षेत्रात आणि सिंहगड रस्ता परिसरातही मेट्रो नेणार आहोत.

"आम्ही बारामती जिंकणारच. या निवडणुकीत राष्ट्रवादीला नॅनो पार्टी करून ठेवणार आहोत. आमच्या विरोधकांनी मोदींचा धसका घेतला आहे. मोगलांना संताजी धनाजी दिसत होते, तसे विरोधकांना मोदी दिसतात. मोदींमुळे हे लोक रात्री दचकून उठतात, असे मला समजले आहे," या शब्दांत त्यांनी मोदींवरील टिकेला उत्तर दिले.

आठवले यांनी कवितांच्या माध्यमातून पवारांवर टीका केली. ते म्हणाले, "राष्ट्रवादीचा रथ आम्ही बारामतीत आडवणार आहोत, कांचन कुल यांना निवडून आणून इतिहास घडविणार आहोत."

जानकर म्हणाले, "मराठा आरक्षण, धनगरांना आरक्षण हे भाजपनेच दिले. काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकांना केवळ नागवले आहे. ओबीसींना घटनात्मक अधिकार मोदींनी दिले. तरीही तुम्ही जातीयवादी म्हणताय, तुमचा तोल गेलाय."

शिवतारे म्हणाले, "सुप्रिया सुळे यांनी सायकल, चपला वाटप केले. ही काय खासदाराची कामे आहे का? तुम्हाला संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाले. पण सामान्यांच्या ताटात काय पडलं, याचे उत्तर द्या." कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण राजवाडे यांनी केले.

मिरवणे सोडून द्या
मी तुम्हाला नवखी वाटते का, असे विचारत कांचन कुल यांनी भाषणाला सुरवात केली. "विकासकामांना निधी केंद्र सरकारने दिला आणि  आमच्या आमदारांनी केलेल्या कामासोबत सेल्फी काढून दुसरेच स्वत:ला मिरवत आहेत. हे मिरविणे आता सोडून द्या, या शब्दांत कुल यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले राहुल शेवाळे यांना सुप्रिया सुळे यांनी घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचे सांगत, त्यांनी तोल सोडू नये, असे बोलणे त्यांना शोभत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. यावेळी शिवसेनेचे रमेश कोंडे, आरपीआयचे परशुराम वाडेकर आणि शिवसंग्रामचे तुषार काकडे यांची भाषणे झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar agreed Beti Bachav Scheme says Fadnavis