Loksabha 2019 : दोघांची प्रतिष्ठा पणाला

अवधूत कुलकर्णी 
Wednesday, 1 May 2019

मावळ लोकसभा मतदारसंघात महाआघाडीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात महायुतीने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना संधी दिली. यामुळे मतदारसंघाचे चित्र बदलले. मात्र, ते भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकेमुळे चिंचवड विधानसभा क्षेत्रातच स्थिर राहिले. 

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात महाआघाडीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात महायुतीने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना संधी दिली. यामुळे मतदारसंघाचे चित्र बदलले. मात्र, ते भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकेमुळे चिंचवड विधानसभा क्षेत्रातच स्थिर राहिले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातल्यामुळे मावळची निवडणूक प्रतिष्ठेची झाली. बारणे यांच्या रूपाने हॅट्ट्रिक साधण्याचे शिवसेनेचे मनसुबे आहेत. तर, पार्थ यांच्या माध्यमातून मतदारसंघ खेचून आणण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीने आखली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मतदारांशी संवाद साधला. मात्र, शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी तर थेट पक्षश्रेष्ठींना बारणे यांचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले. तसेच, थेरगावचा विकास न केल्याचा आरोप करीत बारणे यांच्या भागातील काही जणांनी त्यांना उघड विरोध दर्शविला. 

मनोमिलनाचा देखावा?
श्रीरंग बारणे व लक्ष्मण जगताप यांच्यात मनोमिलन झाल्याचे दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानंतर जगताप प्रचारात दिसू लागले. तीन लाखांचे मताधिक्‍य चिंचवडमधून देणार, असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, खरी परिस्थिती निवडणूक निकालानंतरच कळणार आहे. 

पार्थ यांचा जोरदार प्रचार 
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत शेतकरी कामगार पक्ष सहभागी झाला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे हेसुद्धा मतदारसंघातील उरण, कर्जत, पनवेल भागात तळ ठोकून होते. पार्थ यांच्या प्रचारसभा, रॅलीला मोठी गर्दी जमली होती. अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना भावनिक आवाहन केले होते. 

शिक्षण विरुद्ध अनुभव
पार्थ हे उच्चशिक्षित आहेत. मात्र, त्यांच्याकडे राजकारणाचा कोणताही पूर्वानुभव नसताना थेट खासदारकीचे तिकीट देण्यात आल्याबद्दल राष्ट्रवादीतही नाराजीचे वातावरण होते. पार्थ यांचे मराठीतून कोठेही प्रभावी भाषण झाले नाही. याबाबत त्यांनी मतदारांची निराशा केली. दुसरीकडे श्रीरंग बारणे हे पालिकेचे अनेक वर्षे नगरसेवक होते. खासदारकीच्या पाच वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. 

वंचित आघाडीचे अस्तित्व
लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी नव्हती. यंदा आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. ते किती व कोणाची मते घेतात, यावर श्रीरंग बारणे व पार्थ पवार यांचे भवितव्य ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrirang Barane and Parth Pawar fight in Maval Lok Sabha constituency of Lok Sabha elections