Maval Loksabha 2019 : पार्थ पवारांचा किती प्रभाव? बारणेंसमोर आव्हान निर्माण होणार का?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबातील पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. मावळ मतदारसंघासाठी आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबातील पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. मावळ मतदारसंघासाठी आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली.

मावळ मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. पण यंदा पार्थ यांना उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीनेही येथे चांगलाच जोर लावला आहे. बारणे यांनीही प्रचाराची यंत्रणा जोरदार राबवित राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, पिंपरीतून भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि बारणे यांच्यातील मनोमिलन प्रत्यक्ष मतपेटीत उतरणार का, हा मोलाचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

'मावळमधील शिवसेनेचा उमेदवार बदलावा', अशा आशयाची मागणी जगताप समर्थकांनी केली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर महायुतीची संयुक्त बैठक आणि पत्रकार परिषद झाली. त्यानंतरही भाजपमधील एक गट बारणे यांच्या प्रचारापासून लांब राहिल्याची चर्चा होती.

दुसरीकडे, पार्थ पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी राष्ट्रवादीची सर्व यंत्रणा कामास लावली होती. शेतकरी कामगार पक्षानेही पार्थ यांना समर्थन दिले. यामुळे ही लढत आता राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक ठरली आहे.

मावळमध्ये सायंकाळी सातपर्यंत 58.21 टक्के मतदान झाले. मावळ लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
पनवेल : 55.30
कर्जत : 60.40
उरण : 61.80
मावळ : 61.28
चिंचवड : 57.30
पिंपरी : 56.30


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrirang Barne faces Parth Pawar in Maval constituency for LokSabha 2019