Loksabha 2019 : मतदानादिवशी दक्ष राहा - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 April 2019

‘‘निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी ४८ तासांचा अवधी राहिला आहे, त्यामुळे जोमाने काम करा आणि मतदानाच्या दिवशी सतर्क राहा,’’ असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता. २५) दिला.

पिंपरी - ‘‘निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी ४८ तासांचा अवधी राहिला आहे, त्यामुळे जोमाने काम करा आणि मतदानाच्या दिवशी सतर्क राहा,’’ असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता. २५) दिला. पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शहरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आकुर्डीमधील हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

ईव्हीएम मशिनबाबत निवडणूक आयोगाकडे गंभीर तक्रार आली आहे, त्यामुळे मतदानाच्या दिवशी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे. बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही बूथवर होतो. त्याचप्रमाणे येथेदेखील पोलिंग एजंट सकाळी सहा वाजता पोचायला हवेत. गेल्या दोन दिवसांपासून उकाडा वाढला आहे, त्यामुळे त्याचा विचार करून नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे. शहरात लोकसभा निवडणुकीच्या वेळेस कमी मतदान होते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्‍यकता असल्याचे पवार या वेळी म्हणाले. ईव्हीएम मशिन किंवा मतदानासंदर्भातील अन्य तक्रारींसाठी वॉररूम तयार करण्याची सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. 

पदाधिकाऱ्यांनी अन्य कोणत्या भागात प्रचारासाठी फिरत न बसता आपल्या भागात पदयात्रा काढावी. उगाच अन्यत्र कुठे फिरत बसू नका. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे वेळ आहे, त्यामुळे त्यादृष्टीने सभेचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या. 

अजित पवार सकाळी अकरा वाजल्यापासून शहरात होते. सुरवातीला त्यांनी विविध क्षेत्रांतील खेळाडूंशी संवाद साधला, त्यानंतर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक झाली. संध्याकाळी माहेश्‍वरी समाजाचा मेळावा, पिंपळे सौदागरमधील  प्रमुख ग्रामस्थांचा मेळावा आणि 
प्रमुख डॉक्‍टरांबरोबर त्यांनी संवाद साधला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stay alert on voting day says ajit pawar