Loksabha 2019 : मताला दोनशे-पाचशेचा भाव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 May 2019

शहरातील झोपडपट्टी भागात शनिवार (ता. २७) ते सोमवारी (ता. २९) मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाले असून, एका मतासाठी दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत पैसे दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

पिंपरी - शहरातील झोपडपट्टी भागात शनिवार (ता. २७) ते सोमवारी (ता. २९) मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाले असून, एका मतासाठी दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत पैसे दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत सहसा पैशांचे वाटप होत नाही. मात्र, यंदाची निवडणूक त्याला अपवाद ठरली आहे. या निवडणुकीत दोन राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे एका राजकीय पक्षाने पैसे वाटपाचा निर्णय घेतला. 

शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर रात्री पैसे वाटपाला सुरवात झाली. एका मतासाठी दोनशे ते पाचशे रुपये वाटप करण्यात आले. यामध्ये पिंपरीतील भाटनगर, रमाबाईनगर, कासारवाडी, दापोडी, चिंचवड, सांगवी आदी भागात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याची चर्चा रंगू लागली आहे.

झोपडपट्टी भागात पैसे वाटप होत असल्याचे चार फोन पिंपरी, चिंचवड आणि निगडी परिसरातून पोलिस नियंत्रण कक्षेकडे आले. मात्र, पोलिस पोचण्यापूर्वीच वाटप करणारे पळून गेले होते. त्यामुळे झोपडपट्टी भागात मतदानाला उत्साह होता. परंतु, अनेकांनी पैसे घेऊन आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत दिल्याचे दिसून आले. 

सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘ड्राय डे’ होता. त्यानंतर उघडलेल्या दारूच्या दुकानावर मिळालेल्या पैशातून दारू घेण्यासाठी तळीरामांनी धाव घेतली. तर, काही गृहिणींनी त्या पैशातून आठवडाभराचा किराणा भरल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is a lot of discussion going on in the slum areas for large amount of money