Loksabha 2019 : तुमच्या खासदार म्हणजे फुगडी खेळणाऱ्या, सेल्फी काढणाऱ्या : तावडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

- देशातील छपन्न पक्ष एकत्र आले तरी छप्पन इंचवाल्या मोदींचा पराभव करू शकत नाहीत.
- त्यांचे अबतक छप्पन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही
- शिक्षण मंत्री विनोद तावडेंचा घणाघात
- तुमच्या खासदार म्हणजे फुगडी खेळणाऱ्या, सेल्फी काढणाऱ्या, असं म्हणत सुप्रिया सुळेंची उडविली खिल्ली

पुणे : देशातील छपन्न पक्ष एकत्र आले तरी छप्पन इंचवाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करू शकत नाहीत. त्यांचे अबतक छप्पन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असा घणाघात शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केला. बारामती लोकसभा युती उमेदवार कांचन कुल यांच्या हिंजवडी येथील प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. तुमच्या खासदार म्हणजे फुगडी खेळणाऱ्या, सेल्फी काढणाऱ्या, वृद्धांना चष्मे-काठ्या वाटणाऱ्या असं म्हणत सुप्रिया सुळे यांची तावडेंनी खिल्ली उडवली.

तावडे म्हणाले, ममता, मायावती, चंद्राबाबू, शरद पवार यांना मोदींना हरवायचं आहे पण निवडणूक लढायची मात्र तयारी नाही. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे त्यांना माहीत नाही वाटते. 56 पक्ष एकत्र आले तरी 56 इंचचा पराभव करू शकणार नाहीत. त्यांचे अबतक 56 केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

पवारसाहेब कधी खरं बोलतात का हो? माढा लढणार, लढले नाहीत. पार्थ मावळ लढणार नाही, तो लढतोय. खोटं बोल पण रेटून बोल. पवार पब्लिक स्कुल ग्रामीण भागात काढत नाहीत, सगळ्या शहरी भागात असतात. त्या ही इंग्रजी शाळा. यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं घेणेदेणे नाही. उलट आम्हालाच बोलतात. सुप्रिया सुळे काय काम करतात. फुगडी खेळतात, सेल्फी काढतात, चष्मे वाटतात, वृद्धाना काठ्या वाटतात. काय तर संसदपटू, संसदपटू व्हायचं तर वडिलांना निवृत्त करून तुम्ही राज्यसभेवर जा, असेही तावडे म्हणाले.

पवार पब्लिक स्कुल म्हणजे शिक्षणाचा धंदा, शिक्षणाचं व्यापारीकरण केले. असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबियांवर हल्ला केला. देशात रामराज्य आलं पाहिजे अशी महात्मा गांधींची इच्छा होती. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी मग सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी म्हणतायेत आम्ही गरिबी हटवू. याचा अर्थ याआधीचे कोणीच गरिबी हटवू शकले नाहीत याकडे गडकरींनी बोट दाखवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinod Tawde Targets Supriya Sule In Hinjewadi