Loksabha2019 : केंद्रातून अधिकाधिक निधी आणून पुण्याचा विकास करणार : गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

मागील 25 ते 30 वर्ष विधानसभेत काम केल्यामुळे राज्यातील प्रश्नांचा अभ्यास झाला. केंद्राचा अधिकाधिक पैसा शहरात घेऊन येण्यासाठी हा निर्णय घेतला.

पुणे : मागील 25 ते 30 वर्ष विधानसभेत काम केल्यामुळे राज्यातील प्रश्नांचा अभ्यास झाला. बहुतांशी योजना केंद्राकडून राज्य आणि स्थानिक पातळीपर्यंत येत असतात. अशा योजनांमध्ये सर्वात अधिक वाटा केंद्राचा असतो. त्यामुळेच केंद्राचा अधिकाधिक पैसा शहरात घेऊन येण्यासाठी हा निर्णय घेतला. आमदार, खासदाराचे पद शोभेसाठी नाही. मागीलवेळीच लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तसं झाल नाही. मात्र, यावेळी सुद्धा तिकीटासाठी कधीही दिल्लीला गेलो नाही. असे मत पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांन व्यक्त केले. 'सकाळ'तर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतीत बापट बोलत होते.

मुख्यमंत्र्यांसोबत संबंध चांगले नसल्यामुळे तुम्हाला दिल्लीला पाठविण्यात येत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना बापट म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आमच्यामध्ये कसलेही मतभेद नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या वडिलांसोबत आम्ही काम केले आहे. मुख्यमंत्रीच नाहीतर मोहन जोशी यांच्यासह सर्व पक्षातील नेत्यांशी माझे चांगले संबंध आहे. अन्न धान्य पुरवठा मंत्रालयामध्ये माझ्याकाळात क्रांतीकारक बदल झाले आहेत. माझ्या एवढा पारदर्शक कारभार राज्यातील कुठल्याही मंत्रालायने केला नाही. असेही बापट म्हणाले.

निवडणूकी विषयी बोलताना बापट म्हणाले, कुठलीही निवडणूक साधी नसते, आणि मी कधीही मागच्या दाराने निवडणूका लढल्या नाहीत. मागील चाळीस वर्षापासून काम करत असल्यामुळे पुण्यात मोठा जनसंपर्क झाला आहे. त्याचाच आता मोठा फायदा होत आहे. पुण्यासोबत जल्ह्यातील इतर तीनही मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे. 

लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर माझी सर्वात पहिली भेट खासदार अनिल शिरोळे यांनी घेतली होती. बंडखोरीची शक्यता नाही. बारामतीमध्ये आमच्यासाठी वातावरण चांगले आहे. पवारांच्या एकाच कुटुंबातील किती माणसांनी निवडणूक लढवायची हे सामान्य माणसांना पटत नाही. जनमानसामध्ये ही चर्चा आहे. आणि लोकांना बारामतीमध्ये बदल हवा आहे. मागीलवेळीच त्यामध्ये फरक पडला असता. परंतु, यावेळी बारामतीमधील लोकांच्या मनातील खदखद मतपेटीतून बाहेर पडेल. 

पुण्याच्या जाहीरनाम्यात पुण्याची संस्कृती, परंपरा, आयटी हब, पीएमआरडीए, घरांचा प्रश्न, वाहतूकीचा प्रश्न आदी पुण्याच्या विकासाचा एकूण आराखडा लक्षात घेऊन जाहीरनामा तयार करण्यात येत आहे. मी मागील पालकमंत्र्यांप्रमाणे महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेमध्ये कधिही लक्ष घातले नाही. धोरणांमध्ये मात्र लक्ष घालत असतो. यातूनच विमानतळ, रेल्वे, रिंगरोड आदींसारखे महत्त्वाचे प्रश्न आम्ही सोडवत आहोत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will bring more fund from the center for Pune says Girish Bapat