Election Results : 'अनाकलनीय' राज ठाकरे

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीत मोदी-शाह या जोडीविरुध्द चालविलेल्या 10 सभा महाराष्ट्रभर गाजल्या. त्यापैकी बहुतेक जागी राज ठाकरेंनी तळमळीने केलेले आवाहन जनतेने एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून का दिले असावे यावर जरा नजर टाकूया.

लोकसभा 2019
'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' लोकसभा निवडणूकीच्या निकालात पारडं जड करण्यात नक्कीच प्रभावी ठरेल, असे काल्पनिक चित्र महाराष्ट्रात तरी रंगले होते. पण निकालाचा अर्धा दिवसही संपत नाही तोवर सगळं फिसकटलं!

एकीकडे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील इतर नेत्यांच्या सभा तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या सभा यातील गर्दी, प्रतिसाद यांत खूप फरक बघायला मिळाला होता. राज यांच्या भाषणाचे अनेकजण कायमच फॅन राहीले आहे. पण मोदी फॅन्ससारखं त्यांचं प्रेम मतांमध्ये काही रुपांतरीत झालं नाही. असं का झालं असेल? राज ठाकरे यांनी जनतेपुढे स्क्रिनवर सजविलेल्या पुराव्यांना केवळ टाळ्या अन् शिट्ट्यांपुरतीच किंमत मिळाली का? की राज ठाकरे हे केवळ बोलतात पण स्वतःचा पक्ष सांभाळू न शकल्याची गोष्टं लोकांच्या मनात अडकून तर राहील नसेल?

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीत मोदी-शाह या जोडीविरुध्द चालविलेल्या 10 सभा महाराष्ट्रभर गाजल्या. त्यापैकी बहुतेक जागी राज ठाकरेंनी तळमळीने केलेले आवाहन जनतेने एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून का दिले असावे यावर जरा नजर टाकूया.

राज ठाकरे यांच्या सभा गाजल्या त्या म्हणजे अर्थात त्यांची तडकफडक भाषणशैली, बोलण्यातील आक्रमकता आणि पुराव्यांच्या वापरामुळे. पण त्यांच्या सभांची जादू चालली नाही याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी घेतलेल्या कोणत्याही मतदारसंघातील सभेत त्यांनी स्थानिक प्रश्नांवर भर दिला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचा थेट प्रचार जरी करायचा नसला तरी भाजप-शिवसेने विरोधात बोलताना त्यांच्या स्थानिक उमेदवारांवर थेट टिका किंवा वक्तव्य केली नाहीत आणि राज हे महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत केवळ देश पातळीवर मोदी-शाहंनी कसा भ्रष्टाचार केला, त्यांनी कसे चुकीचे निर्णय घेतले, त्यांच्या निर्णयांनी कसे जनतेचे नुकसान केले, त्यांनी जनतेला खोटी स्वप्ने दाखवून कसे फसवले, यावरच भर दिला.   

पुणे मतदारसंघावर कायमच भाजपचे वर्चस्व राहीले आहे. पालकमंत्री गिरीश बापट हे पुण्यातील तळागाळापर्यंत पोहोचलेलं घरचं व्यक्तीमत्त्व, अशी ओळख त्यांची आहे. येथे काँग्रेसनं मोहन जोशी यांना उमेदवारी दिली होती. पण त्यांना ओळखणारा पुण्यातील जुना वर्ग (वयोवृध्द) आहे. तसेच मुळ पुण्यातील नवीन जनता (युथ) आणि बाहेरून पुण्यात स्थायिक झालेली जनता यांच्या मतांचाही बराचसा कल बापटांकडे राहीला. 

नांदेडमध्ये राज ठाकरे यांच्या सभेने तेथील तरुणवर्ग आकर्षित होईल असा कयास बांधला गेला होता. पण मुख्यमंत्र्यांनी येथे तीन सभा घेतल्या अन् भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्यामागे आपली पूर्ण ताकद लावली. तसेच नरेंद्र मोदी यांची सभाही राज ठाकरे यांच्या सभेवर भारी पडली, असे आजच्या निकालानंतर म्हणायला हरकत नाही. अशोक चव्हाण हे निवडणूकीसाठी नाव घोषित झाल्यावर तितकेसे कार्यशील राहीले नाही. पण निकाल जवळ येण्याच्या काही दिवस आधी त्यांनी प्रचाराचा जोर धरला. ज्याचा परिणाम त्यांचा प्रभाव जनतेच्या मनावर तितकासा बिंबवला गेला नाही. 

येथे देखील राज ठाकरे यांची सभा दणदणीत झाली असली तरी दलित समाजाची 'भावनिक मते' प्रकाश आंबेडकरांच्या शिरपेचात सजली अन् सुशीलकुमार शिंदेंच्या मतात वजाबाकी झाली. ज्याचा थेट फायदा (देशात काँग्रेस विरुध्द भाजप प्रमुख लढत असल्याने) भाजपच्या सिध्देश्वर महास्वामींना झाला. 

मोदी लाटेत कोल्हापूरात जिंकून आलेले राष्ट्रवादीचे धनंजय महाडीक या लोकसभा निवडणूकीत तोंडघशी पडले. येथील पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे इतर नेते, कार्यकर्ते यांच्यात आणि महाडीक फूट पडली. घरात पडलेल्या फूटमुळे त्याचा फायदा प्रतिस्पर्धीला झाला. या परिस्थिती पुढे ठाकरेंची सभा फिकी पडली. 

ऐकेकाळी नाशिकवर राज्य गाजवलेले राज ठाकरे यांचे शब्द येथील जनतेच्या मनातही पकड धरु शकले नाही. तसेच येथेही अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पवन पवारांनी समीर भुजबळांच्या मतांत वजाबाकी केल्याचे चित्र होते. 

मुंबईत भाजप-शिवसेना इतकी मजबूत राहीली की काँग्रेस आसपासही आपले पाय रोवू शकले नाही. भाजप-शिवसेनेने चालवलेली बूथ यंत्रणा येथे मतपरिवर्तनात प्रभावी ठरली अन् राज ठाकरे यांच्या सभा येथे लोकसभेच्या तापलेल्या वातावरणात केवळ मनोरंजन बनून राहील्यात. साताऱ्यात राज ठाकरेंनी सभा घेतली नसती तरी उदयनराजे फॅन्स या जागी त्यांच्याबाबत इतके खात्रीशीर आहेत की ही लढत एकतर्फीच होती, असे म्हणायला हरकत नाही. 

थोडक्यात, राज ठाकरे यांनी आपल्या या सभांमध्ये नोटबंदी, जीएसटी या मुद्द्यांवर सरकारची कानउघडणी केली तर वाढत्या आणि सुरुच असलेल्या शेतकरी आत्महत्येवर भावनिक केले. मोदी सरकारचे 'जुमले' व्हिडीओद्वारे मांडले तर निवडणूक प्रचारात मोदींनी वापरलेली 'सैन्यदलाची कामगिरी' यावर कडाडून टिका केली. तरीही जनतेसाठी पुन्हा हे सर्व मनोरंजनापुरतंच उरलं... मग राज ठाकरे यांना महाराष्ट्र लोकसभा निवडणूकीचा निकाल 'अनाकलनीय' वाटणारच यात आश्चर्य नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Raj thackeray rallies in maharashtra