अंदाजपंचे: आंबेडकरांचा अकोल्यातही पराभव; तर अमरावती, रामटेकचा असा असेल निकाल

सोमवार, 20 मे 2019

अकोल्यात खा. संजय धोत्रे टोलविणार विजयी चौकार 
अमरावतीत आनंदराव अडसूळांना संधी
रामटेकमध्ये "काटे की टक्कर' पण काँग्रेस मारणार बाजी
 

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

अकोल्यात खा. संजय धोत्रे टोलविणार विजयी चौकार 
बदलत्या राजकीय वातारणाचा कोणताही परिणाम न झालेल्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय काँग्रेसचा उमदेवार जाहीर झाल्यानंतरच जवळपास निश्‍चित झाला होता. भाजपसाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ म्हणून अकोल्याकडे बघितले जाते. तीन वेळा विजय मिळविणारे खासदार संजय धोत्रे यांच्या विरोधात काँग्रेसने 2014 प्रमाणेच हिदायत पटेल यांना मैदानात उतरविले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांचीही उमेदवारी कायम राहिली. त्यांच्या नावामागे असलेले भारिप-बहुजन महासंघाचे लेबल बदलून वंचित बहुजन आघाडी झाले. नावाचे लेबल बदलले असले तरी अकोला लोकसभा मतदारसंघात निकालावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, हे निश्‍चित आहे. त्यामुळे विद्यमान खासदार संजय धोत्रे हे लोकसभेच्या मैदानावर विजयी चौकार टोलविणार हे निश्‍चित आहे. मतदारसंघात धोत्रे यांच्या विजयापेक्षा दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे हिदायत पटेल राहणार की ‘वंचित’चे अॅड. प्रकाश आंबेडकर राहणार याचीच चर्चा जास्त आहे.

अमरावतीत आनंदराव अडसूळांना संधी
सलग दोन वेळा अमरावती लोकसभा मतदारसंघावर ताबा मिळविणाऱ्या खासदार आनंदराव अडसूळ यांना परत एकदा विजयाची संधी आहे. अर्थात यंदाची निवडणुक अतिशय अटीतटीची असल्याने किती मतांनी ते जिंकतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या नवनीत राणा यांच्याशी त्यांची थेट लढत होती. वंचित बहुजन आघाडी तसेच बसपाच्या उमेदवाराचा येथे जास्त जोर नसल्याने अमरावतीत थेट लढत झाली. नवनीत राणा यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढल्याने त्यांची चांगलीच हवा होती, मात्र, काही ठिकाणी मोदीच हवेत असे म्हणत मतदारांनी युतीच्या उमेदवाराला मतदान केले. नवनीत राणा आघाडीच्या उमेदवार असल्या तरी त्या कोणत्याही राष्ट्रीयकृत पक्षाच्या चिन्हावर लढल्या नाहीत. त्या अपक्ष होत्या. त्यामुळे त्यांना जनतेपर्यंत चिन्ह पोहचविण्यास मोठे कष्ट घ्यावे लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची हवी तशी साथ त्यांना मिळाली नसल्याचेही बोलले जात आहे. त्या तुलनेत भाजप व सेनेच्या नेत्यांनी चांगलाच जार लावल्याने आनंदराव अडसूळ यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

रामटेकमध्ये "काटे की टक्कर' पण काँग्रेस मारणार बाजी
रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकूण 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कृपाल तुमाने व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्यात "काटे की टक्कर' झाल्याचे चित्र 11 एप्रिल रोजी मतदानानंतर दिसून येत आहे. पाच वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामगिरीच्या बळावर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी प्रचार केला. तर उच्च शिक्षित व प्रशासनातील जाणकार व्यक्ती उमेदवार असल्याने कॉंग्रेसने जनतेकडे मतांचा जोगवा मागितला होता. दोन्ही पक्षाकडून 50 ते 70 हजारांची आघाडी मिळवून विजयाचा दावा केला असला तरी काँग्रेस किशोर गजभिये या मतदारसंघात बाजी मारणार हे निश्चित आहे. तरीही ग्रामीण भागातील जनतेने रामटेक लोकसभा मतदारसंघातचा शिलेदार म्हणून कुणाला पसंती दिली, हे निकालाच्या दिवशी म्हणजेच 23 मे रोजीच स्पष्ट होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 result prediction in Akola Amarawati and Ramtek Losksabha constituency