अंदाजपंचे: लातूरमध्ये पुन्हा कमळच; तर बीड, उस्मानाबादचा निकाल धक्कादायक!

शनिवार, 18 मे 2019

- लातूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळच !
- बीडचा निकाल काही वेळ तरी खरा वाटणार नाही.
- उस्मानाबादमध्ये निंबाळकर मारणार बाजी !

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

लातूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळच
लातूर राखीव लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे. मागील निवडणुकीत भाजपचा उमेदवार अडीच लाखाचे मताधिक्क्य घेऊन विजयी झाला होता. या वेळी मताधिक्य कमी झाले तरी भाजपचे सुधाकर श्रंगारे विजयी होणार आहेत. वंचित आघाडीमुळे मतदारसंघात पहिल्यांदाच तिरंगी लढत पहायला मिळाली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कॉंग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांनी जोरदार मुसंडी मारली. यातच वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राम गारकर यांनी कोणत्या पक्षाची मते पळवली, या प्रश्नाचे उत्तर अजूनही कोणाला सापडले नाही. वंचित आघाडीने भाजपची मते घेतल्याचा दावा कॉंग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत तर वंचित आघाडीचा फटका कॉंग्रेसला बसणार असल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत. या चर्चेत वंचित आघाडीला निवडणूकीत चांगले मते मिळून शेवटी भाजपचाच उमेदवार निवडणूक येण्याचे गणिते मांडली जात असल्याने लातूरमध्ये कमळ फुलणार हे निश्चित आहे.

बीडचा निकाल काही वेळ तरी खरा वाटणार नाही
राज्यात चर्चेची आणि भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालाबाबत आजही दोन्ही पक्ष तेवढेच कॉन्फीडन्ट आहेत. त्यामुळे 23 तारखेला लागलेला निकाल काही वेळ तर खरा वाटणारा नसेल आणि अगदीच धक्कादायकच असेल. खा. प्रितम मुंडे यांना पुन्हा उमेदवारी दिलेल्या भाजपकडून सुरुवातीला बळीचा बकरा कोण, असे टोमणे राष्ट्रवादीला मारले गेले. पण, राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरविले आणि निवडणुकीचा नुरच पालटला. 'शेतकरी पुत्र' ही टॅगलाईन सोनवणेंसाठी फायद्याची ठरली आणि त्यांना मतदारांत मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपच्या नाकी नऊ आले. शेवटच्या टप्प्यात दोन्ही पक्षांकडून ही निवडणुक जातीवर येऊन ठेपली. मराठा, वंजारा, मुस्लिम, ओबीसी असे जातीची गणिते लाऊन दोन्ही पक्षांच्या गोटात आजही विजयाचाच आकडा जुळत आहे. मात्र, मतांतील फुट, वंचित आघाडी आणि अपक्षांची मते यामुळे राष्ट्रवादीचे गणित बिघडणार आहे. आजघडीला दोन्ही बाजूने विजयाचा तेवढाच आत्मविश्वास आहे. राष्ट्रवादीत विजयाचा विश्वास पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांइतका विश्वास राष्ट्रवादीला मतदान करणाऱ्या मतदारांत आहे. त्यामुळे बजरंग सोनवणेंची चर्चा जोरात आहे. परंतु, जातीय समिकरणे डॉ. प्रितम मुंडे यांच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसतात. त्यामुळे जो काही निकाल लागेल तो पराभूत होणाऱ्याइतकाच विजयी होणाऱ्यांनाही धक्का देणारा असला तरी भाजपच्या विद्यमान खासदार प्रितम मुंडे याच बीड लोकसभा मतदारसंघात बाजी मारणार हे नक्की आहे.

उस्मानाबादमध्ये निंबाळकर मारणार बाजी !
उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये तगडी लढत झाली आहे. राष्ट्रवादीच्या राणाजगजितसिंह पाटील यांचा नियोजनबध्द प्रचार व यंत्रणा देखील तेवढीच सक्षम होती. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस याच्यातील पारंपारीक विरोध बाजुला ठेवुन हे दोन्ही पक्ष अत्यंत विश्वासाने एकत्र आल्याचे दिसुन आले. ही पाटील यांच्यादृष्टीने जमेची बाजु आहे. या उलट शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना पक्षांतर्गत बंडाळीचा सामना करावा लागला असला तरी मतदारसंघात ओम राजेनिंबाळकरांना भाजपची मिळालेली साथ निर्णायक आणि पोषक ठरली आहे. निवडणुकीत कोण विजयी ठरणार हे वंचित बहुजन आघाडीच ठरवेल अशी शक्यता आहे. म्हणूनच, जेवढी जास्त मते वंचित आघाडीच्या उमेदवाराला पडतील तेवढा ओम राजेनिंबाळकरांना फायदा होईल. म्हणूनच, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांचा विजय निश्चित मानला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 result prediction in Beed Osmanabad and latur Losksabha constituency