अंदाजपंचे: भंडारा-गोंदियात राष्ट्रवादी वरचढ तर, चंद्रपूर गडचिरोलीचा असा असेल निकाल

बुधवार, 22 मे 2019

- चंद्रपुरात काट्याच्या लढतीत अहिरांचे पारडे जड
- भंडारा-गोंदिया मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच झेंडा
​- गडचिरोली-चिमूरमध्ये भाजप उमेदवाराला विजयाची संधी

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

चंद्रपुरात काट्याच्या लढतीत अहिरांचे पारडे जड
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्यात थेट लढत झाली. मंत्रिपदाच्या काळात क्षेत्रासाठी भरीव कामगिरी करता न आल्याने मतदारांत अहीरांप्रती नाराजी होती. या नाराजीचा फायदा धानोरकर यांना मिळणार असले तरी, मागील २० वर्षांपासून भाजपने हा चंद्रपूरचा गड काबिज केला असल्याने भाजपचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. हंसराज अहीर हे या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात. मोदी सरकारच्या काळात अहीर यांच्याकडे केंद्रीय उर्वरक गृहराज्यमंत्री आणि नंतर गृहराज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. तर, शिवसेनेचे बंधन तोडून आमदारकीचा राजीनामा देत धानोरकरांनी काँग्रेसचा हात धरला. त्यानंतर गटातटात विखुरलेली काँग्रेस बाळू धानोरकरांच्या विजयासाठी एकवटलेली दिसली तरी वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे हेसुद्धा बऱ्यापैकी मते घेतील, याचा फटका धानोरकरांसोबत अहिरांनाही बसेल असे मतदारसंघात बोलले जात असले तरी शेवटी थोड्याफार फरकाने का होईना हंसराज अहिर हेच विजयी होणार असल्याचे बोलले जात आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच झेंडा
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले कारू नान्हे यांचा प्रचार कमी झाला. तसेच ते अनुभवी असले तरी, समाजात मिसळत नाहीत. त्यामुळे त्यांना कमी मते मिळण्याचा अंदाज आहे. गोंदिया येथील पंतप्रधान मोदींच्या सभा, भंडारा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेनंतर भाजपचा प्रचार वाढला. परंतु, प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात सभा घेतल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना तुल्यबळ मते मिळण्याची शक्यता आहे. वंचित आघाडीचा प्रभाव नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची काही हजार मतांनी सरसी होऊ शकते. तिसऱ्या क्रमांकाची मते बसपच्या विजया नांदुरकर यांना मिळू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे हे बावणे कुणबी समाजाचे आहेत. तर, सुनील मेंढे हे खैरे कुणबी आहेत. भंडारा गोंदिया जिल्ह्यात बावणे कुणबी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे श्री. पंचबुद्धे यांना अधिक मते मिळण्याचा अंदाज आहे. भाजपचे भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर केल्यावर राष्ट्रवादीने नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली. पंचबुद्धे माजी शिक्षण राज्यमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते. परंतु, यावेळी प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना धडक प्रचारात सहभाग घेता आला नाही. भाजपचे मेंढे यांनी नगराध्यक्षपदाशिवाय कोणत्याही निवडणुकीचा व जबाबदारीच्या पदाचा अनुभव नाही. त्यामुळे मोदी व भाजपच्या नावावर त्यांना मते मिळतील. जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. एकूणच सर्व समिकरणे लक्षात घेता भंडारा-गोंदिया मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार आहे हे निश्चित...

गडचिरोली-चिमूरमध्ये भाजप उमेदवाराला विजयाची संधी
गडचिरोली-चिमुरमध्ये भाजप उमेदवारावला विजयाची संधी असून गडाचिरोली-चिमुर या लोकसभा क्षेत्रात काँग्रेस व भाजपच्या उमेदवारात अटीतटीची लढत होत असून यात भाजपचे अशोक नेते यांच्या विजयाची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या निवडाणूकीत भाजपचे अशोक नेते अडीच लाख मत्तांनी विजयी झाले होते. मात्र यंदा या लोकसभा क्षेत्रात काही भागात त्यांच्या विरोधात कौल दिसुन येत आहे. त्यातच भाजपच्या चार आमदारांनी विरोधात काम केल्याची ओरड आहे. त्यामुळे डॉ. नामदेव उसेंडी यांना विजयाची संधी असल्याचा दावा केला जात असला तरी गेल्यावेळची त्यांना मिळालेली लिड मोठ्या प्रमाणात कमी होईल पण थोड्याफार फरकाने का होईना अशोक नेते यांना विजयाची संधी असल्याचे बोलले जात आहे. सोबतच, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किती मते घेणार यावरही भाजप व काँग्रेस उमेदवाराचे भवितव्य असल्याने भाजपचा उमेदवार हा खूप थोड्या फरकाने निवडून येण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 result prediction in Gadchiroli, Chandrapur and Bhandara gondiya Losksabha constituency