अंदाजपंचे: साताऱ्यात उदयनराजेंचाच विजय तर, कोल्हापूर सांगलीचा असा असेल निकाल!

मंगळवार, 14 मे 2019

साताऱ्यात पक्ष नाही उदयनराजे महत्वाचे
कोल्हापुरात मुन्ना महाडिक अडचणीत!
सांगलीत बॅटची चर्चा पण, विजय संजयकाका पाटलाचांच!

निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न.

साताऱ्यात पक्ष नाही उदयनराजे महत्वाचे
सातारा लोकसभा मतदारसंघात लढत ही एकतर्फीच होती असे दिसते. साताऱ्यातील मतदार पक्ष बघून नाहीतर उदयनराजे यांच्याकडे बघून मतदान करतात. उदयनराजेंच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराची फक्त चर्चा होते असे इथल्या लोकांचे म्हणणे आहे. म्हणूनच साताऱ्यात फक्त उदयनराजेंचीच चर्चा असून उदयनराजेंचा विजय निश्चित असल्याने राष्ट्रवादीची ही जागा नक्की निवडणूर येणार आहे. 

कोल्हापुरात मुन्ना महाडिक अडचणीत!
कोल्हापुरात महाडिकांचाच अंमल चालणार, हा दावा या आपल्या मतदानातून खोटा ठरवण्याचं कोल्हापूरच्या मतदारांनी ठरवलेलं दिसतंय. याच मतदारांच्या जोरावर धनंजय महाडिक ऐन मोदी लाटेतही राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. पण त्यानंतर महाडिक कंपनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची कळ काढत राहिले. त्यामुळे या सगळ्यांनी मिळून महाडिकांना अडचणीत आणलंय. त्यात काँग्रेसच्या बंटी पाटलांच्या आमचं ठरलंयची चांगलीच चर्चा झाली. तरीही, महाडिकांची स्वतःची यंत्रणा असली तरीही, या मतदारसंघात खासदार बदलाचे संकेत असून शिवसेनेचे संजय मांडलिक या मतदारसंघात विजयी होतील अशी चिन्हे आहेत.

सांगलीत बॅटची चर्चा पण, विजय संजयकाका पाटलाचांच!
विशाल पाटील यांना दिलेली उमेदवारी इथेट राजू शेट्टींनी अर्धी लढाई जिंकली होती. 2014च्या निवडणुकीतही काँग्रेसला पावणेचार लाख मतं मिळाली होती. ती फक्त वसंतदादांची पुण्याई आहे. आता तो आकडा वाढू शकतो. आणि तोच विशाल पाटलांना तारू शकतो. अर्थातच विद्यमान खासदार भाजपचे संजयकाका पाटील यांना हरवणं सोपं नाही. मतदारसंघात असलेलेल चार आमदार, भाजपच्या ताब्यात असलेली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही भाजपची जमेची बाजू असल्याने संजयकाका बाजी मारण्याची चिन्हे दिसत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचाही मतदारसंघात जोर दिसला, मतदारसंघात मात्र, बॅटचीही चर्चा होती पण विजय मात्र भाजपच्या संजय काका पाटील यांचा होईल अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 result prediction in Kolhapur Sangli and satara Losksabha constituency