अंदाजपंचे: हातकणंगलेत शेट्टी, तर, माढा आणि सोलापूरचा असा असेल निकाल !

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

हातकणंगले राजू शेट्टींसाठी मुश्कील असले तरी विजय शेट्टीचांच !
माढा मतदारसंघात मामांचीच चलती !
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच जिंकणार!

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच जिंकणार!
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून जेष्ठ नेते माजी केंद्रिय मंत्री सुशिलकुमार शिंदे, भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढविल्याने सोलापूरात प्रथमच तिरंगी लढत झालेली पाहायला मिळाली. या निवडणुकीत सिद्धेश्वर स्वामी यांना जातीचा दाखला असल्याचा फायदा होईल असे बोलले जात आहे. तर, प्रकाश आंबेडकर या मतदारसंघात उभे राहिल्याने सुशिलकुमार शिंदेसाठी सोपी वाटणारी निवडणूनक अवघड झाली. आंबेडकरांचा नातू आपल्यासाठी झटतोय या भावनेतून दलित समाजाने प्रकाश आंबेडकरांना मोठ्या प्रमाणावर मतदान केले आणि याच मतविभाजनाचा फटका शिंदेना बसला. उच्चवर्णीय मानल्या जाणाऱ्या समाजाचे मतदान स्वामी यांना मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तसेच, मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्याने आणि पालकमंत्री विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी लावलेल्या जोरामुळे मतदारसंघात सिद्धेश्वर स्वामींचा विजय निश्चित आहे.

माढा मतदारसंघात मामांचीच चलती
यंदा निवडणुकीत सगळ्यात प्रतिष्ठेची म्हणून माढाची जागा चर्चेत आली. सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणातले दिग्गज विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून अनेकांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली दिसते. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद इथे उभी केली होती. पण ते पेलवण्याची ताकद नुकतेच काँग्रेसमधून भाजपमधे आलेले रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यात नव्हती. त्यामुळे मात्र शरद पवारांचे उमेदवार संजयमामा पाटील यांचं घड्याळ चाललं, अस दिसतंय. सर्वसामान्यांमधे मिसळणारा उमेदवार आणि मोहिते पाटील विरोधकांची एकी यामुळे राष्ट्रवादी मतदानाच्या दिवसापर्यंत आघाडीवर दिसली. माढा मतदारसंघातील करमाळा, माढा आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातून संजय शिंदे यांना मोठी लीड मिळणे अपेक्षित असल्यामुळे संजय शिंदे यांचा विजय निश्चित आहे.

हातकणंगले राजू शेट्टींसाठी अवघड असले तरी विजय शेट्टीचांच !
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना ही निवडणूक सोपी गेली नाही. यावेळी राजू शेट्टींच्या कामावर कोण बोललेच नाही. यावेळेस शेट्टींची जात काढली गेली. भाजपने आपली सगळी ताकद पणाला लावली. शेट्टी सेफ वाटत असले तरी, त्यांचा पराभव हा शिवसेनेच्या उमेदवारांकडून नाहीतर वंचित बहुजनच्या उमेदवारांमुळे होईल, असे दिसत आहे. वंचितच्या उमेदवाराला लाखभर मते जरी पडली तरी शेट्टींसाठी मोठा अडथळा होणार आहे हे स्पष्ट दिसत असले तरी थोड्या फरकाने का होईना राजू शेट्टींचाच विजय होईल.

Web Title: Loksabha 2019 result prediction of Madha Solapur and hatkanangale Losksabha constituency