अंदाजपंचे: रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार तर, रायगड आणि पालघरमध्ये असा असेल निकाल!

सोमवार, 13 मे 2019

- रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार!
- रायगडच्या मतदारांना बदल हवा...
- पालघरमध्ये गावितांची खासदारकी कायम राहणार!

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार!
नारायण राणेंची हवा आता पूर्णपणे कमी होत चालली असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे. शिवसेनेबद्दल प्रेम म्हणून नाही तर राणे नकोत म्हणून इतर सगळे पक्ष विनायक राऊतांच्या सोबत राहताना रत्नागिरी सिंधुदुर्गात दिसले. त्यामुळे रत्नागिरीत-सिंधुदुर्गात राणे हरणार? हीच चर्चा आहे. काँग्रेस तर या निवडणुकीत कुठेच दिसली नाही. या निवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या स्थानी दिसली. सोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांच्या बळावर विनायक राऊत यांचा विजय निश्चीत आहे.

रायगडच्या मतदारांना बदल हवा...
रायगड लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. रायगडच्या मतदारांनी केंद्रिय मंत्री अनंत गिते यांना सहावेळा लोकसभेवर पाठवले आहे, पण यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांना बदल हवाय. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात 2014ला मोदी लाट असताना गीते कसेबसे निवडून आले होते. त्याला राष्ट्रवादीचे सुनील तटकरे तेव्हाही तगडे उमेदवार होते आणि आताही आहेत. ही सारी गणितं पाहून रायगड लोकसभा मतदारसंघात बदल निश्चीत आहे. म्हणूनच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिल तटकरे यांचा विजय होणार अशी गणिते रायगड मतदारसंघात बनली होती.

पालघरमध्ये गावितांची खासदारकी कायम राहणार!
बहुजन विकास आघाडीला चिन्ह जनतेपर्यंत नेताना, बिंबविताना पालघर लोकसभा मतदारसंघात कष्ट घ्यावे लागले आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीत बहुजन विकास आघाडीपुढे (बविआ) नव्या चिन्हाची रिक्षा मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना धक्का मारताना घाम गाळावा लागला. "बविआ'ची वाट अशी अवघड दिसत असल्यामुळे राजेंद्र गावितांची खासदारकी कायम राहणार हे निश्चित आहे. पण हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. या वेळी मतदारसंघ शिवसेनेला दिल्याने भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. सोबत गावितही भाजपमधून आयात केलेले उमेदवार असल्याने अनिश्चितता असल्याचे दिसत असले तरी, पालघरमध्ये गावितांची खासदारकी कायम राहिल व या जागेवर शिवसेनेचा विजय होईल हे नक्की आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 result prediction in Ratnagiri Sindhudurga Losksabha constituency